औरंगाबाद : महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. या महिला लोकशाही दिनात मागील सहा महिन्यांत केवळ एकच महिला तक्रार दाखल करण्यासाठी आली. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण किंवा यासारख्या इतर अन्यायांविरुद्ध महिलांना दाद मागता यावी, यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो.
स. ११ ते १२ हा एक तासाचा वेळ यासाठी निश्चित असतो. जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी या दिनाचे कामकाज बघतात. दि. १८ जून रोजी महिला लोकशाही दिन पार पडला; मात्र यावेळीही अधिकाऱ्यांव्यतिरिक्त एकही तक्रारदार महिला आलेली नव्हती. येथे महिलांनी मोकळेपणाने तक्रार मांडावी आणि महिला व बालविकास विभागाने पाठपुरावा करून तक्रारकर्त्या महिलेच्या अडचणी दूर कराव्यात किंवा संबंधित विभागांना तशा सूचना द्याव्यात, असे अपेक्षित आहे; मात्र महिलांना असा लोकशाही दिन असतो, हेच माहीत नाही. २०१८ मध्ये केवळ फेब्रुवारी महिन्यात एक महिला तक्रार घेऊन आली होती. यानंतर मात्र कोणतीही महिला या विभागाकडे फिरकलेली नाही.
अनेक महिला तालुका स्तरावर असणारा महिला लोकशाही दिन, महिला समुपदेशन केंद्र यासारख्या पर्यायी व्यवस्थांकडे दाद मागण्यासाठी जातात किंवा जेथे त्यांच्यावर अन्याय होतो, त्या कार्यालयात दाद मागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या दिनाला प्रतिसाद कमी मिळतो. या दिनाचा प्रचार व प्रसार करण्यात विभाग कुठेही कमी पडला नसून विभागातर्फे अंगणवाडी सेविका, एनजीओ, बचत गट या माध्यमातून महिला लोकशाही दिनाचा प्रचार व प्रसार केला जातो, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती ढेरे यांनी स्पष्ट केले.