जालन्याच्या रेल्वेकडून औरंगाबादला ‘ओव्हरटेक’; पीटलाइनचे तिकडे काम सुरू, इकडे कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 07:18 PM2022-09-01T19:18:40+5:302022-09-01T19:19:10+5:30
पीटलाईनमुळे औरंगाबादवरून लांब पल्ल्याच्या रेल्वे सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, औरंगाबादची पीटलाईन लवकर होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जालन्यात पीटलाइनचे काम सुरू झालेले आहे. पीटलाइनबरोबरच येथे ‘लोको शेड’ तयार करण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे औरंगाबादरेल्वे स्टेशनवर पीटलाइनची जागा निश्चित झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नाहीत. रेल्वे सुविधांच्या बाबतीत जालना औरंगाबादला मागे टाकत असल्याची परिस्थिती आहे.
औरंगाबादेत अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाईनची प्रतीक्षा होती. पीटलाईन आधी औरंगाबाद व नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारीला जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाईन करण्याची मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लावून धरली. अखेर मे महिन्यात औरंगाबादेत १६ बोगींच्या पीटलाईनसाठीही २९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपये मंजूर करण्यात आले. परंतु, त्यापुढे प्रत्यक्षात पीटलाइन उभारणीला गती मिळत नसल्याची परिस्थिती आहे. जालन्यात पीटलाइनसह लोको शेड आणि रेल्वेच्या सोयी-सुविधांमध्ये भर पडत आहे.
जागा निश्चित, पण..
चिकलठाण्याऐवजी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर कार्यालयाच्या परिसरात ही पीटलाईन होणार आहे. पीटलाईनमुळे औरंगाबादवरून लांब पल्ल्याच्या रेल्वे सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, औरंगाबादची पीटलाईन लवकर होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
रेल्वे अधिकारी म्हणतात...
यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, जालन्यातील पीटलाइनचे काम सुरू झाले. औरंगाबादच्या पीटलाइनचा समावेश ‘गती शक्ती’ योजनेत केला जाणार आहे, असे सांगण्यात आले.
पीटलाइन मार्गी लागावी
औरंगाबादच्या पीटलाइनची नुसती घोषणा झाली. प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. जुनी पीटलाइन आहे. ती दुरुस्त करण्याचा विचारही करता येईल. काम लवकर सुरू करावे.
- ओमप्रकाश वर्मा, मराठवाडा रेल्वे विकास समिती