विकास राऊत, औरंगाबादशहरातून बाहेर जाण्यासाठी आणि बाहेरून शहरात येण्यासाठी रेल्वेस्टेशन ते बीड बायपासमार्गे वाळूजकडे कनेक्ट होणारा व पैठण या तीर्थक्षेत्राकडे तसेच औद्योगिक वसाहतींकडे जाणारा औरंगाबाद ते पैठण हा रोड खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. पावसाळा संपेपर्यंत नागरिकांची खड्डे आणि वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होणे शक्य नाही. मनपा हद्दीतून सुमारे १० कि़मी.पर्यंतचे अंतर असलेला हा रोड २४ तास वाहतुकीच्या कोंडीत असतो. पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग हाती घेणार असून, ३० कोटी रुपयांतून लिंकरोडपर्यंत चौपदरीकरण आणि तेथून पुढे पैठणपर्यंत नूतनीकरण करण्यात येणार आहे. ४५ कि़ मी. वर असलेल्या पैठण या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापर्यंत जाण्यासाठी ३ तास लागण्याचे कारण म्हणजे खड्डेयुक्त व अरुंद रोड होय. औद्योगिक वसाहती, शाळा, कांचनवाडी, नक्षत्रवाडीतील नवीन टाऊनशिपमुळे महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीपर्यंत नागरीकरणाचा रेटा वाढतो आहे. त्यातच सातारा-देवळाईची वाहतूकदेखील याच रोडवरून वाहते. त्यामुळे हा रोड अपघातासाठी आमंत्रण देणारा ठरतो आहे.मागील पाच वर्षांपासून या रोडच्या चौपदरीकरणावर चर्चा होत आहे. बीओटीची सुमारे ३५० कोटी रुपयांची निविदा गेल्या वर्षी राज्य शासनाने रद्द केल्यानंतर हा रोड टोलमुक्त धोरण राबवून निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु वर्ष झाले, अजूनही त्या रोडचे भाग्य काही फळफळले नाही. १ फुटाहून अधिक मोठे खड्डे त्या रोडवर पडलेले आहेत. कार्यकारी अभियंता म्हणातात...सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर यांनी सांगितले की, अंदाजे १० ते १५ दिवसांमध्ये महानुभाव आश्रम ते लिंकरोडपर्यंत चौपदरीकरण करणे आणि तेथून पुढे पैठणपर्यंत नूतनीकरण करणे. या कामाच्या निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. एमएसआरडीसी आणि एनएचएआयमार्फत रोडचे काम होईपर्यंत तात्पुरता का होईना तो रोड बांधकाम विभाग वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी तातडीने दुरुस्त करणार आहे. यासाठी शासनाकडून ३० कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणे अपेक्षित आहे. पावसाळ्यानंतरच त्या रोडचे काम वेगाने होईल.
औरंगाबाद ते पैठण रोडचे काम पावसाळ्यानंतरच
By admin | Published: July 16, 2016 1:03 AM