कुख्यात दरोडेखोरास बीडमध्ये ठोकल्या बेड्या; नातेवाईक महिलांचा स्वतःचे कपडे फाडून विरोध
By राम शिनगारे | Published: September 30, 2022 02:58 PM2022-09-30T14:58:59+5:302022-09-30T15:01:00+5:30
मोक्कातील आरोपीला भेटण्यासाठी आलेल्या कुख्यात दरोडेखोरास ठोकल्या बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची बीड न्यायालय परिसरात कारवाई
औरंगाबाद : मोक्कातील एका आरोपीला भेटण्यासाठी कुख्यात दरोडेखोर बीड न्यायालयात नातेवाईक महिलांसह येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालय परिसरात सापळा लावला. न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आरोपी दिसताच त्याला पकडले. मात्र, आरोपीच्या सोबतच्या महिलांनी स्वत:चे कपडे फाडून घेत नग्न होऊन विरोध करु लागल्या. तेव्हा बीड पोलिसांची मदत घेत आरोपीला बेड्या ठोकल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नितीन मिश्रीलाल चव्हाण (२५, रा. मालेगाव खुर्द, ता. गेवराई, जि.बीड) असे दरोडेखोराचे नाव आहे. पैठण तालुक्यातील दाभरुळ शिवारात दोन ठिकाणी २६ जुनच्या रात्री दरोडा टाकला होता. या दरोड्याचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने करीत शाहरुख आब्रश्या पवार (रा. टाकळी अंबड, ता. पैठण), रोहीदास उर्फ रोह्या रामभाऊ बर्डे (रा. चाैडांळा, ता. पैठण) या दोघांना पकडले. या दोघांसोबत नितीन चव्हाण हा सुद्धा होता. तो दोन महिन्यांपासून सतत ठिकाण बदलून राहत होता. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. नितीन चव्हाण २९ सप्टेंबर रोजी बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार बीडच्या एलसीबी पथकाची मदत घेत निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, नाईक शेख नदीम, शेख अख्तर, वाल्मिक निकम, विजय धुमाळ, रामेश्वर धापसे आणि राहुल गायकवाड यांचे पथक न्यायालय परिसरात पोहचले. परिसरात त्याचा शोध घेतल्यानंतर तो प्रवेशद्वारासमोर आढळुन आला. त्यास पकडल्यानंतर सोबतच्या महिलांनी अंगातील कपडे स्वत: फाडून घेत सार्वजनिक ठिकाण नग्न होत आरडाओरड करीत अंगविक्षेप केला. तरीही एलसीबीच्या पथकाने आरोपीस सोडले नाही. त्यास ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. तसेच औरंगाबादेत आणून पाचोड पोलिसांच्या हवाली केले. या आरोपीच्या विरोधात तीन दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याचेही अधीक्षक कलवानिया यांनी सांगितले.
शासकीय कामकाज अडथळ्याचा गुन्हा
आरोपीला पकडताना नातेवाईक महिलांनी गोंधळ घातल पोलिसांना अडथळा निर्माण केला. त्यामुळे उपनिरीक्षक प्रदीप ठुबे यांनी बीड येथील शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देत शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा महिलांच्या विरोधात नोंदविला आहे.