औरंगाबादमध्ये पोलिसांच्या ५३२ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे; पोलिसांना मिळणार उत्तम घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 07:18 PM2019-04-29T19:18:21+5:302019-04-29T19:18:35+5:30

पोलीस आयुक्तालयाच्या मागे टोलेजंग इमारती उभ्या

Aurangabad police's 532 houses project complete; The best houses to get the police | औरंगाबादमध्ये पोलिसांच्या ५३२ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे; पोलिसांना मिळणार उत्तम घरे

औरंगाबादमध्ये पोलिसांच्या ५३२ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे; पोलिसांना मिळणार उत्तम घरे

googlenewsNext

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या मागील जुनी पोलीस वसाहत पाडून तेथे सात मजली इमारती बांधण्यात येत आहेत. या अत्याधुनिक पोलीस वसाहतीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन महिन्यांत या ५३२ आलिशान सदनिकांचे पोलिसांना वाटप होणार आहे.

शहर पोलीस दलात सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी पन्नास ते साठ टक्के पोलिसांनी शहरात त्यांची स्वत:ची घरे बांधलेली आहेत.उर्वरित पोलिसांना मात्र स्वत:ची घरे नसल्याने एक तर ते जुन्या पोलीस वसाहतीत किंवा भाड्याने घर घेऊन राहतात. नव्याने भरती होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून मात्र पोलीस वसाहतीमध्ये घर राहण्यास मिळावे, यासाठी प्रयत्न केला जातो. शहरात पोलीस आयुक्तालय, क्रांतीचौक आणि सिडको या ठिकाणी पोलीस वसाहती आहेत. क्रांतीचौक पोलीस वसाहतीमधील घरांना ४० हून अधिक वर्षे झाल्याने सर्व घरे जीर्ण होऊन मोडकळीस आली आहेत. यामुळे तेथे केवळ बोटावर मोजण्याएवढेच पोलीस कर्मचारी राहतात. 
अशाच प्रकारची अवस्था सिडको पोलीस वसाहतीत आहे. या वसाहतीमधील घरांची नियमित डागडुजी होत नसल्याने तेथील अनेक इमारतींमध्ये कुणीही राहत नाही. मोजक्याच वसाहतीत पोलीस कर्मचारी राहतात. 

या वसाहतीमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने पोलीस कुटुंबियांचे हाल होत असतात. उपलब्ध घरे ही राहण्यायोग्य नाहीत. शिवाय आहे ती कमी पडत असल्याची समस्या लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयामागील जुनी पोलीस वसाहत जमीनदोस्त करून तेथे ५३२ घरांचा प्रस्ताव शासनास सादर केला. शासनाने तो मंजूर केला. फेब्रुवारी २०१७ मध्ये या पोलीस वसाहतीचे काम सुरू झाले.
आता वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले. आता केवळ वायरिंगचे काम सुरू असून, ते येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, या वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक बेड, हॉल आणि किचन (वनबीएचके) तर पोलीस अधिकाऱ्यांसाठी टू बीएचके टाईपची घरे आहेत. तेथे ९ इमारतीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ५०४ घरे, तर अन्य दोन इमारतींत पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी टाईप तीन प्रकारची २८ घरे बांधली जात आहेत.

150 कोटी 93 लाखांचा प्रकल्प
पोलीस आयुक्तांचा जुना बंगला पाडून बंगल्याच्या मागील बाजूस दुसरा अलिशान बंगला बांधण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांसोबतच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठीही स्वतंत्र निवासस्थानाचे बांधकाम पोलीस आयुक्तालय परिसरात सुरू आहे. पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने बांधकामासाठी तब्बल १५० कोटी ९३ लाख रुपये खर्च होत आहे. दोन महिन्यांत सर्व बांधकाम पूर्ण होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्रांतीचौक पोलीस वसाहतीत 400 क्वॉटर्स बांधण्याचा प्रस्ताव
क्रांतीचौक पोलीस ठाण्यामागील जुनी पोलीस वसाहत पाडून तेथे पोलिसांसाठी तब्बल ४०० घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तत्त्वानुसार तेथे व्यावसायिक गाळे बांधले जाणार आहे. त्यालगतच पोलीस वसाहत असेल. क्रांतीचौक पोलीस ठाणेही मुख्य रस्त्यावर स्थलांतरित करण्याचा विचार प्रशासनाचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Aurangabad police's 532 houses project complete; The best houses to get the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.