औरंगाबाद ‘आरटीओ’चा महसूल भारी, तरीही कारभार ‘प्रभारी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:19 PM2022-12-13T17:19:31+5:302022-12-13T17:19:43+5:30
दोन वर्षांपासून नियमित अधिकाऱ्यांची प्रतीक्षाच
औरंगाबाद : औरंगाबाद आरटीओ कार्यालय वर्षाला उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल देत आहे. मात्र, येथील कारभार गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. अधिकाऱ्यांना एकाच वेळी दोन शहरांचा कारभार सांभाळावा लागत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. मात्र, नियमित अधिकाऱ्यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
आरटीओने २०२०-२१ या आर्थिक वर्षात १०५ टक्के महसूल गोळा केला आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड या तिन्ही कार्यालयांनी दिलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक महसूल दिला. औरंगाबाद आरटीओ कार्यालयात संजय मेत्रेवार हे १६ एप्रिल २०१८ रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते हे ३० जून २०२० रोजी सेवानिवृत्त झाले, तेव्हापासून मेत्रेवार यांच्याकडे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारीपदाचाही पदभार देण्यात आला होता. त्यांच्या दोन वर्षांच्या कालावधीत आरटीओ कार्यालयाच्या महसूलात मोठी वाढ झाली. करोडी येथील आरटीओ कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्नही मार्गी लागला.
मेत्रेवार यांच्याकडे मुंबई येथे उपपरिवहन आयुक्त (प्रशासन) पदाचा कार्यभार देण्यात आला आणि औरंगाबाद प्रादेशिक परिवहन अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार १ डिसेंबरला जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी स्वीकारला. नियमित अधिकारी मिळण्याऐवजी प्रभारींवरच आरटीओ कार्यालय चालविले जात आहे.
दोन अधिकाऱ्यांवरच मदार
आरटीओत सध्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपद रिक्त आहे. सध्या दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. यातील एक अधिकारी महिनाअखेर सेवानिवृत्त होतील. त्यामुळे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यावरच कार्यालयाची मदार असेल.