औरंगाबाद - शुक्रवारी रात्री किरकोळ भांडणातून पेटलेले औरंगाबाद शांत करण्यासाठी आता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच अफवांचा फैलाव रोखण्यासाठी औरंगाबादेतील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री औरंगाबादमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन हिंसक संघर्षात झाले. या संघर्षात दोघांना आपले जीव गमवावे लागले. अनेक दुकाने तसेच पोलिसांच्या आणि खाजगी मालकीच्या गाड्याही जाळण्यात आल्या. पोलिसांनी सुरुवातीची संयमाची भूमिका सोडून कडक कारवाई करण्यास सुरु केल्यानंतर सकाळपासून दंगलखोर गायब होण्यास सुरुवात झाली. दुपारी ही बातमी प्रकाशित होत असताना शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी एक प्रकारची तणवपूर्ण शांतता होती.
औरंगाबाद शहरातील मोतीकारंजा भागात महापालिकेचे पथक अनधिकृत नळ जोडणीविरोधात कारवाईसाठी गेले होते. तेथे त्यांनी कारवाईस सुरुवात करताच आमचेच का त्यांचे का नाही असा वाद सुरु झाला. त्यातूनच पुढे दोन गटांमध्ये संघर्ष सुरु झाला. आधी शाब्दिक वादावादी झाली जी नंतर हिंसक संघर्षात बदलली. राडा करण्यासाठी जमावाने चाकू, तलवार, लाठ्या-काठ्यांचा मुक्त वापर केला. दोन्ही बाजूंच्या जमावांनी केलेल्या गडफेकीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. आगी लावण्याच्या घटना घडल्याने अनेक जखमी झाले. जखमींमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह सामान्य पोलीस शिपायांचा समावेश आहे. जमावाने पोलिसांच्या गाड्यांचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान केले. पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली तसेच गोळीबार केल्यानंतरच जमाव नियंत्रणात आला.
राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही औरंगबादकरांना शांततेचे आवाहन केले आहे. स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त असता तर रात्री परिस्थिती चिघळली नसती, असा आरोप केला. कचरा आंदोलनाच्यावेळी मोठा फौजफाटा आणि काल रात्री मात्र तोकडी व्यवस्था, अशी टीका त्यांनी केली. मात्र त्यांनीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वत्र फिरुन प्रयत्न केल्याचा दावा महापौर घोडके यांनी केला.