औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे राज्य आणि केंद्र शासनाकडून शिर्डीला झुकते माप दिले जात आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावरून आता २० सप्टेंबरपासून दिल्ली, तर १ आॅक्टोबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
चिकलठाणा विमानतळावर सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन विमान कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, ारुपतीशी हवाई सेवेने जोडलेले आहे. दिल्लीहून विमानसेवेने औरंगाबादला येऊन शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या संख्येवर आगामी कालावधीत परिणाम होणार आहे.
शिर्डी विमानतळाचे गतवर्षी १ आॅक्टोबर रोजी उद्घाटन झाले होते़ यानंतर मुंबई व हैदराबाद सेवा नियमित सुरू झाली़ अवघ्या वर्षभरातच शिर्डी विमानतळाने कनेक्टिव्हिटीत टेकआॅफ घेतला आहे. शिर्डीतून दिल्लीसाठी भाविकांची मोठी मागणी आहे़ त्या पार्श्वभूमीवर येत्या २० सप्टेंबरपासून दिल्ली-शिर्डी-दिल्ली ही विमानसेवा सुरू होत आहे़ स्पाईस-जेट-एअरलाईन्सचे बोर्इंग ७३७-८०० हे १८९ आसनी विमान दुपारी दिल्लीतून १२़४५ वाजता निघून २़३० वाजता शिर्डीत पोहोचेल़ अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर हे विमान तीन वाजता दिल्लीसाठी शिर्डीतून उड्डाण करील़ १ आॅक्टोबरपासून स्पाईस जेटचे क्यू-४०० हे ७८ आसनी विमान बंगळुरूहून सकाळी शिर्डीला येईल व येथून मुंबईला जाईल.
शिर्डीत डिसेंबर अखेर दहा विमानेशिर्डीहून डिसेंबर अखेर रोज दहा विमाने सुरू करून देशातील विविध शहरे शिर्डीला जोडली जाणार आहेत, अशी माहिती सोमवारी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरूहोऊ शकलेली नाही. विमानतळ प्राधिकरणासह उद्योजकांनी राज्य आणि केंद्राच्या मंत्र्यांना साकडे घातले; परंतु विमानसेवेत भर पडलेली नाही. दिल्लीत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत औरंगाबादेतून नव्या विमानसेवेसंदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिर्डीचा विमानतळाचा फटकाशिर्डी विमानतळाचा औरंगाबाद विमानतळास निश्चित फटका बसतो आहे. शिर्डीहून हळूहळू इतर ठिकाणांसाठी सेवा सुरूहोतील. त्यामुळे औरंगाबादेतील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची गरज आहे. -जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड
९ दिवसांपासून ट्रू जेट रद्दआॅपरेशनल रिजनमुळे ट्रू जेटची विमानसेवा २७ आॅगस्टपासून विस्कळीत झाली आहे. औरंगाबाद-हैदराबाद हे विमान मंगळवारीदेखील रद्द राहिले. त्यामुळे बुकिंग केलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही विमानसेवा कधी सुरळीत होणार, याकडे लक्ष लागले आहे. विमान उपलब्धतेबरोबर प्रवासी संख्येच्या कारणामुळे हे विमान रद्द होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.