पाणी मिळेना, कचरा हटेना; पथदिवे लागेनात; चार महिन्यांपासून औरंगाबादकर मेटाकुटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:30 AM2018-06-15T11:30:02+5:302018-06-15T11:32:10+5:30
पाणी मिळेना, कचरा हटेना आणि पथदिवे लागेना, अशा त्रांगड्यात नागरिक मेटाकुटीने दिवस काढीत आहेत.
औरंगाबाद : ११९ दिवसांपासून शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक वैतागले आहेत, तर ६० दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना महागडे टँकरचे पाणी घ्यावे लागते आहे. त्यातच आता पावसाळ्याच्या तोंडावर पथदिव्यांचा लपंडाव सुरू झाला आहे. सेवा, सुरक्षा, विकासाचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या पालिका सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ आणली आहे. पाणी मिळेना, कचरा हटेना आणि पथदिवे लागेना, अशा त्रांगड्यात नागरिक मेटाकुटीने दिवस काढीत आहेत.
कधी पहाटे तर कधी रात्री तर कधी दिवसा, अशा पद्धतीने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सध्या सुरू असून, आठवड्यातून चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा नवीन पायंडा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाडल्यामुळे शहरवासीय मेटाकुटीला आले आहेत. मुबलक पाणीपुरवठा होत असतानादेखील नियोजनाअभावी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे.
आठवड्यात नियोजन करा
अडीच महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाने तीन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. शहरात पाण्याची ओरड कायम आहे. पाणीपुरवठा विभागाने येत्या आठवड्यात दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी गुरुवारी दिले.
दूषित पाणीपुरवठा
कोणत्याही दिवशी पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलवाहिनीत साचलेले आणि नव्याने सोडण्यात आलेले पाणी दूषित होऊन ते नळांना येत आहे. त्यामुळे कावीळसारखे आजार होऊ लागले आहेत. पुंडलिकनगर परिसरात लहान मुलांना ताप येणे, उलट्या होण्यासारखे आजार होऊ लागले आहेत. हा प्रकार शहरातील बहुतांश भागात होतो आहे. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी दूषित पाणीपुरवठ्यावरून आकांडतांडव केले.
नगरसेवकांचा संताप
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, साथरोगांचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरत आहे. शहराच्या स्वच्छतेवरून स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर नगरसेवक संतप्त झाले.
महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
घनकचरा व्यवस्थापनासाठी घनसावंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांना ४ महिने महापालिकेत कायम ठेवावे, अशी मागणी करणारे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. ९ मार्चपासून मांडुरके पालिकेत शासनाच्या आदेशाने कचरा समस्या सोडविण्यासाठी कार्यरत झाले आहेत. दरम्यान, अंबडचे मुख्याधिकारी नंदकुमार भोंबे बुधवारी सहायक आयुक्त म्हणून महापालिकेत रुजू झाले.