औरंगाबादकरांच्या स्वप्नातील ‘स्मार्ट बस’ रस्त्यावर आलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:35 PM2018-12-24T23:35:10+5:302018-12-24T23:35:42+5:30
महापालिकेने रविवारी बराच गाजावाजा करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट बस’चे लोकार्पण केले. सोमवारपासून शहर बस रस्त्यावर धावतील... आपण त्यात बसू, असे स्वप्न औरंगाबादकरांनी रंगविले होते. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम महापालिकेने केले. सोमवारी एकही बस शहरातील रस्त्यांवर धावली नाही. मनपाला प्राप्त झालेल्या चारही बस आरटीओ कार्यालयात पासिंगच्या प्रक्रियेत अडकल्या होत्या. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत बससेवा सुरू होईल किंवा नाही, याची अजिबात शाश्वती नाही.
औरंगाबाद : महापालिकेने रविवारी बराच गाजावाजा करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट बस’चे लोकार्पण केले. सोमवारपासून शहर बस रस्त्यावर धावतील... आपण त्यात बसू, असे स्वप्न औरंगाबादकरांनी रंगविले होते. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम महापालिकेने केले. सोमवारी एकही बस शहरातील रस्त्यांवर धावली नाही. मनपाला प्राप्त झालेल्या चारही बस आरटीओ कार्यालयात पासिंगच्या प्रक्रियेत अडकल्या होत्या. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत बससेवा सुरू होईल किंवा नाही, याची अजिबात शाश्वती नाही.
महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांना बस खरेदीची बरीच घाई झाली होती. टाटा कंपनीकडून ३६ लाख रुपयांमध्ये एक बस खरेदी करण्यात आली. तब्बल १०० बसची आॅर्डर कंपनीला देण्यात आली आहे. कर्नाटकच्या धारवाड येथे बसची बांधणी सुरू आहे. आतापर्यंत मनपाला चार बस प्राप्त झाल्या आहेत. रविवारी महापालिकेने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर बसचे लोकार्पण केले. पहिल्या भाग्यवान ग्राहकाला तिकीटही देण्यात आल्याची घोषणा केली. सोमवारी किमान चार बस शहरातील प्रमुख मार्गांवर धावतील, असे औरंगाबादकरांना वाटत होते. कारण मागील आठ दिवसांमध्ये महापालिकेने शहर बसची जोरदार मार्केटिंग केली होती. सोमवारी एकही बस मनपाने रस्त्यावर आणली नाही. कंपनी आणि मनपाचे अधिकारी पासिंगच्या प्रक्रियेत होते. दिवसभरात एकाच बसची पासिंग झाली. बुधवारी उर्वरित बसची पासिंग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
४३ बस कधी येणार...
शहर बस चालविण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळ पार पाडणार आहे. पहिल्या टप्प्यात ४० ते ४५ बस येतील, असे सांगण्यात आले होते. डिसेंबरअखेपर्यंत मनपाला फक्त ४ बस प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित ४३ बस जानेवारी महिन्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. एस.टी. महामंडळाने तूर्त ४० बस चालविण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित ६० बस चालविण्यासाठी महामंडळाला मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करावी लागणार आहे.
बसथांबे जशास तसे
महापालिकेने मोठा गाजावाजा करून शहर बसचे लोकार्पण तर केले; परंतु आतापर्यंत मनपाने एकही बसथांबा अद्ययावत केलेला नाही. स्मार्ट सिटीतील बसथांबे अद्ययावत राहतील, अशी घोषणा मनपाकडूनच करण्यात आली होती. बसथांबे कोठे असावेत, याचेही नियोजन मनपाने आजपर्यंत केलेले नाही. त्यासाठी लागणाºया खर्चाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. फक्त बस खरेदी करून एस.टी. महामंडळाला देण्याचीच घाई मनपाला होती.