औरंगाबादकरांची तहान भागणार; मनपा एमआयडीसी, हर्सूल तलावातून १० एमएलडी पाणी उचलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 07:03 PM2022-05-10T19:03:40+5:302022-05-10T19:04:50+5:30
‘लोकमत’इफेक्ट : हर्सूल तलावातून ६, एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली
औरंगाबाद : सिडको-हडकोसह शहराला तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या गंभीर समस्येवर ‘लोकमत’ने ७ मेपासून वृत्त मालिका सुरू केल्यामुळे शासन, प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने ठोस पाऊल उचलले असून हर्सूल तलावातून ६ एमएलडी अतिरिक्त पाणी उचलण्याच्या कामाला सुरूवात झाली. एमआयडीसी प्रशासनाकडून ४ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळण्यास सुरुवात झाली.
उन्हाळा सुरू झाल्यापासून शहराला पाणीटंचाईची समस्या भेडसावते आहे. एप्रिल महिन्यात पारा ४२ अंशापर्यंत गेल्याने पाण्याची मागणी आणखी वाढली. महापालिकेकडून समाधानकारक पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचा आक्रोश वाढू लागला. नागरिकांच्या मनातील खदखद ‘लोकमत’ने जाणली. शहरातील पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत ‘हॅलो लोकमत’मध्ये वृत्तमालिकाच सुरू करण्यात आली. नागरिकांनीही ‘लोकमत’च्या या भूमिकेस पाठिंबा दिला. जायकवाडीहून १३० ते १४० एमएलडी पाणी शहरात दररोज येत आहे. त्यानंतरही पाणीटंचाई का? नागरिकांच्या हक्काचे पाणी कोण पळवतय, महापालिकेकडून कोणतेही नियोजन करण्यात येत नाही. लाईनमन ठरवेल तिच पूर्वदिशा समजून काम करण्यात येत असल्याबद्दल ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली.
जुन्या शहराला मोठा दिलासा
हर्सूल तलावातून महापालिका दररोज फक्त ४ एमएलडी पाण्याचा उपसा करीत होती. या पाण्यात १० एमएलडीपर्यंत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून सोमवारी हर्सूल तलाव ते जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ३५० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यास सुरूवात झाली. पुढील ३ दिवसात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर हर्सूल तलावातून अतिरक्त ६ एमएलडी पाणी जुन्या शहराला मिळेल. हे पाणी दिल्लीगेट, शहागंज पाण्याच्या टाकीपर्यंत आणले जाईल. हर्सूल तलावात सध्या मुबलक पाणी असून, ते जुलै अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज आहे.
एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणी
मनपाने नियुक्त केलेल्या टँकरच्या कंत्राटदाराकडून एन-५, एन-७, कोटला कॉलनी, नक्षत्रवाडी येथून ९५ टँकर भरण्यात येतात. दररोज ५०० फेऱ्या टँकरच्या होतात. ४ ते ५ एमएलडी पाणी टँकर लॉबी पळवून नेत होती. सर्व टँकर हळूहळू एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्यावर शिफ्ट करण्यात येत आहेत. एन-७ येथून टँकर भरणे सध्या बंद केले. सध्या एमआयडीसी १ एमएलडी पाणी देत आहे. लवकरच ४ एमएलडीपर्यंत टँकरसाठी पाणी मनपाला मिळणार आहे.