औरंगाबादमधील १९ जीएसटी अधिकाऱ्यांची तडकाफडकी मुंबईला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 07:18 PM2019-11-29T19:18:11+5:302019-11-29T19:19:25+5:30
मध्यावधी अचानक झालेल्या या कारवाईमुळे अधिकाऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे.
औरंगाबाद : राज्य जीएसटी विभागातील १९ अधिकाऱ्यांची तडकाफडकी मुंबईला प्रतिनियुक्ती बदली करण्यात आली आहे. मध्यावधी अचानक झालेल्या या कारवाईमुळे अधिकाऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. परिणामी, गुरुवारी दुपारी अधिकाऱ्यांनी राज्य जीएसटी कार्यालयासमोर प्रशासनाच्या कार्यवाहीविरोधात निदर्शने केली.
राज्य जीएसटीच्या औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, बीड, अशी तीन जिल्हे येतात. येथील एकूण १५ राज्य कर अधिकारी व ४ सहायक राज्य कर आयुक्तांची प्रतिनियुक्ती बदलीमुंबई येथील राज्य जीएसटी आयुक्तालयात करण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे की, मुंबई येथील जीएसटीच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा युद्धपातळीवर करण्यासाठी ही प्रतिनियुक्त बदली करण्यात आली आहे. बदलीमध्ये मराठवाडा, खान्देश व विदर्भ मिळून जीएसटी विभागातील १४ सहायक राज्य कर आयुक्त व ८० राज्य कर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
विशेष राज्य कर आयुक्तांनी काढलेल्या या आकस्मिक व अस्थायी अशा आदेशामुळे राज्य कर अधिकारी धास्तावले आहेत; परंतु याचा परिणाम अधिकारी वर्गावर होणार असल्याचा दावा जीएसटी राजपत्रित अधिकारी संघटनेने केला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद विभागातील कर संकलनावरसुद्धा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्यावधी बदल्यांमुळे अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होणार आहे. शिवाय अधिकाऱ्यांचे मनोबल आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या या आदेशाविरुद्ध संघटनेच्या सर्व सदस्यांनी गुरुवारी रेल्वेस्टेशनसमोरील राज्य जीएसटी कार्यालयासमोर दुपारच्या सुटीत निदर्शने केली. यावेळी संघटनेचे विभागीय सहसचिव रवींद्र जोगदंड यांनी मार्गदर्शन केले.