औरंगपुरा पोलीस चौकीजवळ जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 04:32 PM2019-03-01T16:32:21+5:302019-03-01T16:32:33+5:30
या अड्ड्यावर १४ मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
औरंगाबाद : औरंगपुरा पोलीस चौकीपासून काही अंतरावर राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी दुपारी छापा मारून गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. या अड्ड्यावर १४ मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला.
त्यात खेळण्यासाठी लागणारे ५४ हजार रुपयांचे क्वाईन, ४० हजारांची रोकड, असा दीड लाख रुपयांचा ऐवज, जुगाराचे साहित्य गुन्हे शाखेने जप्त केले. सीसीटीव्ही तपासणी सुरू असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
विष्णू तनवाणी, चंदन शांतीलाल पहाडिया (चंदू पहिलवान), बाळू आनंदराव जाधव, राहुल गोविंदराव धुळे, बंडू बाबूराव भरते, कृष्णा पांडुरंग दळवी, राजू रमेश खरात, धम्मरत्न सुदामराव इंगळे, राजेंद्र काशीनाथ मरमट, रंगनाथ नामदेव नरोडे, बाबूखाँ इसाखाँ, सुभाष एकनाथ वाघ, नजीमोद्दीन मोहंमद अब्दुल, रामचंद्र ठामसिंग राजपूत, अशी जुगाऱ्यांची नावे आहेत. यातील नजीमोद्दीन हा गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
या अड्ड्यावर २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासताना २ कॅमेऱ्यांची जोडणी नसल्याचे समोर आल्यावर शंका बळावली. त्यानंतर आणखी तपासणी केल्यावर त्या दोन कॅमेऱ्यांचा डीव्हीआर वेगळा ठेवण्यात आल्याचे समोर आले. त्या डीव्हीआरमधील फुटेज तपासल्यावर चंदू पहिलवान पैशांवर जुगार खेळताना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले. कायदेशीर बाबी तपासून या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची पोलिसांची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या पथकाने केली.