ऑरिक सिटी सर्वांगीण विकासाचे केंद्र, कनेक्टीव्हिटी वाढीसाठी नीती आयोग करणार प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 06:21 PM2021-06-12T18:21:58+5:302021-06-12T18:26:56+5:30
Niti Aayog CEO Amitabh Kant on Auric City : ऑरिक सिटीमुळे औरंगाबाद देशातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाईल
औरंगाबाद : ऑरिक सिटी उद्योगाप्रमाणेच वसाहती, अतिथी सेवा, पर्यटन, व्यापार या क्षेत्रातील विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे एकात्मिक सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणून आगामी काळात गणले जाईल. यासाठी रस्ते वाहतूक, हवाई वाहतूकीच्या सुविधात वाढ करण्यासाठी निती आयोग प्रयत्न करीत आहे अशी माहिती निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज दिली. शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या सभागृहात आज दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या ऑरिक सिटी (शेंद्रा-बिडकीन) आणि दिघी पोर्ट औदयोगिक क्षेत्र विकासाचा अमिताभ कांत यांनी आज आढावा घेतला.
यावेळी कांत म्हणाले की, ऑरिक सिटीमध्ये उदयोगांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आगामी काळात या ठिकाणी मोठया प्रमाणात उद्योगांची भर पडणार आहे. त्यामुळे औरंगाबाद व परिसरातील औद्योगिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. याशिवाय नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे विकासाला अधिक चालना मिळेल. औरंगाबादच्या विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानांची वाहतूक सुरु होईल. जेणेकरुन उदयोगांच्या विकासाबरोबर येथील पर्यटनालाही चालना मिळेल. तसेच औरंगाबाद शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक वसाहत केंद्र होण्यास नक्कीच मदत होणार आहे. या विकासात्मक बदलासाठी निती आयोग निश्चितच सहकार्य करेल, असे ही त्यांनी सांगितले.
ऑरिकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा विकास
ऑरिक सिटी उद्योगाप्रमाणेच वसाहती, अतिथी सेवा, पर्यटन, व्यापार या क्षेत्रातील विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे एकात्मिक सर्वागिंण विकासाचे केंद्र म्हणून आगामी काळात गणले जाईल. यासाठी रस्ते वाहतूक, हवाई वाहतूकीच्या सुविधात वाढ करण्यासाठी निती आयोग प्रयत्न करीत आहे. देशाप्रमाणेच जगातील उद्योगक्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजकांना गुंतवणूकीसाठी आकर्षित करणाऱ्या सुविधा ऑरिकच्या माध्यमातून दिल्याने औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होण्यास मदत होणार आहे, शेंद्राप्रमाणे दिघी येथील औद्योगिक क्षेत्राचाही विकास करण्यात येणार आहे, असेही कांत यांनी सांगितले.
औद्योगिकदृष्ट्या देशात सर्वोत्कृष्ट शहर ठरेल
उद्योगांसाठी सुनियोजित पायाभूत सुविधा असल्यामुळे आगामी काळात औरंगाबाद शहराचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे. यामुळे शहर औद्योगिकदृष्ट्या देशातील सर्वोत्कृष्ट विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास कांत यांनी व्यक्त केला. यावेळी डिएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनंबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते आदींची उपस्थिती होती.