सरासरी ३५ टक्के विद्यार्थ्यांची कॉलेजमध्ये उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:02 AM2021-02-17T04:02:07+5:302021-02-17T04:02:07+5:30
औरंगाबाद : तब्बल अकरा महिन्यांनंतर सोमवारी १५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील पदवी अभ्यासक्रमाचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे वर्ग उघडले. जिल्ह्यात ...
औरंगाबाद : तब्बल अकरा महिन्यांनंतर सोमवारी १५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील पदवी अभ्यासक्रमाचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे वर्ग उघडले. जिल्ह्यात १९५ महाविद्यालयांतील एकूण १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची सरासरी उपस्थिती ३५ टक्के एवढी होती. दुसरीकडे, शहरातील महाविद्यालयांमध्ये ५० टक्के विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्च २०२० पासून संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र ठप्प झाले होते. शाळा- महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना घरी बसूनच ऑनलाईन परीक्षा द्याव्या लागल्या. त्यानंतर त्यांचे ऑनलाईनच वर्ग सुरू झाले; परंतु त्यात अनेक अडचणी येत होत्या. प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटची रेंज मिळत नव्हती. आभासी पद्धतीच्या अध्यापनाचे आकलन नीट होत नव्हते. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले होते. तथापि, शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू केले. अलीकडे बऱ्यापैकी कोरोना आटोक्यात आल्यामुळे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय होत नसल्यामुळे पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी चिंताग्रस्त होते. शेवटी १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालयांत आलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचे चेहरे आनंदाने खुलून दिसत होते. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थी व उर्वरित ५० टक्के विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात येण्याची परवानगी द्यावी, असा महाविद्यालयांना नियम घालून दिला आहे. त्यानुसार महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने शासनाच्या नियम व अटींचे सर्व सोपास्कार पाळले जात आहेत.
चौकट....
ना मास्क, ना सॅनिटायझर
विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची व सोबत सॅनिटायझर ठेवण्याची सूचना महाविद्यालयांनी दिली होती. पण, काल पहिल्या दिवशी महाविद्यालयाच्या प्रांगणात घोळक्याने फिरणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडे या दोन्ही बाबी दिसून आल्या नाहीत. वर्गात बसतानाच तेवढे विद्यार्थी मास्क घातलेले दिसले.
चौकट....
- जिल्ह्यात एकूण महाविद्यालये - १९५
- सुरू झालेली महाविद्यालये - १९५
- पहिल्या दिवशी उपस्थिती - ३५ टक्के
- तालुकानिहाय उपस्थिती
तालुका महाविद्यालये उपस्थिती
औरंगाबाद शहर ९५ ५० टक्के
औरंगाबाद २४ ४० टक्के
फुलंब्री ०५ २२ टक्के
सिल्लोड १२ २८ टक्के
सोयगाव ०८ १८ टक्के
कन्नड ११ ३० टक्के
खुलताबाद १३ ३० टक्के
गंगापूर ११ ३० टक्के
वैजापूर ०५ ३० टक्के
पैठण १० २८ टक्के
चौकट....
आम्ही विद्यार्थ्याची काळजी घेतो
स.भु. विज्ञान महाविद्यालयाने संपूर्ण वर्गखोल्या, लॅबोरेटरी, ग्रंथालय व परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे, महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रवेशद्वारातच तापमान, ऑक्सीजनचे प्रमाण तपासले जाते. द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तासिका घेतल्या असून अभ्यासक्रम पूर्ण होत आला आहे. त्यामुळे या वर्गांचे प्रात्याक्षिके पूर्ण करण्यावर आता भर देत आहोत.
- डॉ. बालाजी नागटिळक, प्राचार्य.