लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबईला जाण्यासाठी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना नव्या रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘दमरे’च्या नांदेड विभागाने प्रस्ताव देऊन अनेक महिने लोटली; परंतु कधी रेल्वे बोर्डाकडे, तर कधी मध्य रेल्वेक डे बोट दाखविले जात आहे. या टोलवाटोलवीमुळे प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.औरंगाबादहून मुंबईला जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय पाहता नांदेड ते मुंबई नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर जूनमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या औरंगाबाद दौ-यानंतर नांदेड ते मुंबईसाठी लवकरच नवीन रेल्वे मिळणार असल्याची घोषणा नांदेड विभागाने केली.राज्यराणी एक्स्प्रेसला आठ बोगी जोडून नांदेड-मुंबई रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला; परंतु मागील सात महिन्यांपासून यावर निर्णय झालेला नाही. मुंबईत रेल्वेच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेवर प्रचंड ताण आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नव्या रेल्वेला मंजुरी मिळत नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते, तर कधी प्रस्ताव बोर्डाकडे असल्याचे सांगितले जाते. याविषयी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाºयांनी सांगितले की, सध्या प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आहे. या रेल्वेसाठी प्रयत्न सुरू आहेत.मुंबईसाठी नव्या रेल्वेची टिष्ट्वटरद्वारेही मागणी केली जाते; परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. प्रस्ताव पाठविला की नाही, यावरच शंका उपस्थित होते. प्रवाशांच्या सुविधेसाठी ही रेल्वे लवकर सुरू झाली पाहिजे, असे नमो हायवे अॅण्ड रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गौतम नहाटा म्हणाले.
नव्या रेल्वेसाठी टोलवाटोलवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:47 AM