औरंगाबाद : प्रसुतीसाठी जालन्याहून आईवडीलाकडे आलेल्या ३० वर्षीय विवाहीतेचा तान्ह्या बाळासह तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही झाल्याची घटना उल्कानगरीत येथे आज सकाळी ८.३० वाजता घडली. रोहिणी राहुल भंडारी (३०)असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तान्ह्या बाळाचे नामकरण झाले नव्हते.
फौजदार बाळासाहेब आहेर यांनी सांगितले की, रोहिणीचा विवाह जालना येथील राहुल भंडारी यांच्यासोबत झाला होता. भंडारी यांचा जालन्यात कापडाचा व्यवसाय असून, गत दिड महिन्यापूर्वीच पहिली प्रसुती असल्याने रोहिणी माहेरी आली होती. उल्कानगरी परिसरातील मुथा कॉम्प्लेक्स येथे त्या वडील चंद्रकांत तातेड यांच्याकडे राहत होत्या. आज सकाळी ८.३० च्या दरम्यान कॉम्प्लेक्सच्या बाहेर काही तरी पडल्याचा आवाज झाल्याने तेथील रहिवासी बाहेर आले असता त्यांना रोहिणी त्यांच्या मुलासह बेशुद्ध अवस्थेत खाली पडल्याली दिसली. यानंतर इमारतीमधील शेजाऱ्यांनी ही माहिती रोहिणीच्या वडिलांना दिली. रोहिणीला व बाळाला खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघानाही तपासून मृत घोषित केले. फौजदार बाळासाहेब आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रोहिणीने आत्महत्या केली की ती टेरेसवरून पडली याविषयी उलगडा झालेला नव्हता. या विषयी जवाहरनगर पोलीस आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.