आईची घालमेल : नकोशी समजून टाकून दिलेले ते बाळ माझेच !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 02:28 AM2020-10-03T02:28:26+5:302020-10-03T02:28:51+5:30
आईची घालमेल : डीएनए अहवालानंतरच मिळणार बाळाला मायेची ऊब
सुनील शिरोडे ।
शिऊर (जि. औरंगाबाद) : पाच मुलींनंतर सहाव्या बाळाला मी जन्म दिला. तीही मुलगीच असल्याचा समज करून घेऊन मी कुठलीच शहानिशा न करता थेट घरी आले. वेदना होत असल्याने झोपी गेले. पुरुष जातीचे अर्भक सापडल्याची चर्चा गावात सुरू झाल्यानंतर माझे डोळे उघडले. हे बाळ माझे आहे. ते मलाच मिळायला हवे... सुनीता साळुंके या आईची बाळासाठीची ही घालमेल शब्दांत न बसणारी.
३० सप्टेंबर रोजी पुुरूष जाती अर्भक आढळल्यानंतर एका दाम्पत्याने त्यावर दावा केल्याने वैजापूर तालुक्यातील टुनकीत खळबळ उडाली होती. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी या गावाला भेट दिली. टुनकीतील सुनीता व अशोक साळुंके या दाम्पत्याला पाच मुली. सहाव्यांदा गरोदर असलेल्या सुनीता शेतात गेल्या असता त्यांची प्रसूती झाली. हा घटनाक्रम स्वत: सुनीता यांनी ‘लोकमत’ला सांगितला. त्या म्हणाल्या, ३० सप्टेंबरला पोटात दुखत असल्याने मी सकाळी ९ वाजेदरम्यान जवळील शेतात शौचास गेले होते. त्याच ठिकाणी अर्भकास जन्म दिला; परंतु सहाव्यांदासुद्धा मुलगीच असेल, असा समज करून घेऊन मी थेट घरी आले. प्रसूतीनंतर तब्येत खराब झाल्याने मी झोपी गेले. काही वेळानंतर गावात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याची वार्ता कानावर आल्यानंतर मला आनंद झाला. म्हणून मी पुन्हा तिथे जाऊन बाळ माझेच असल्याचे सांगितले. आता मला माझे बाळ हवे आहे. अर्भकाला टाकून दिल्याप्रकरणी या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी या अर्भकास औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवले आहे.
आज होणार डीएनए चाचणी
नवजात अर्भकासह साळुंके दाम्पत्याची डी.एन.ए. चाचणी झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. शुक्रवारी त्यांची चाचणी होईल, असे पोलिसांनी सांगितले.