Video: संतापजनक! विद्यापीठात तलवार, लाठ्याकाठ्या घेऊन घुसले बजरंग दलाचे कार्यकर्ते
By राम शिनगारे | Published: February 14, 2024 03:52 PM2024-02-14T15:52:27+5:302024-02-14T16:04:43+5:30
तोंडाला भगवे रुमाल, हातात तलवार, लाठ्याकाठ्या घेऊन विद्यापीठ परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये आज दुपारी बजरंग दल संघटनेचे काही कार्यकर्ते घुसले. हातामध्ये लाठ्या काठ्या आणि तलवार घेऊन तोंडाला भगवे रुमाल बांधत हे कार्यकर्ते विद्यापीठ परिसरात फिरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर तरुणांचे हे टोळके विद्यापीठातून निघून गेले.
मागील आठवड्यात विद्यापीठांमध्ये दुचाकीवर आलेल्या काही तरुणांनी विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आज विद्यापीठांमध्ये अचानक तोंडाला रुमाल बांधलेले चाळीस ते पन्नास हुल्लाडबाज तरुण घुसले. प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले की, हातात तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन विद्यापीठ परिसरात बजरंग दलाशी संबंधित या तरुणांच्या टोळक्याने धुडगूस घातला. विद्यापीठ मुख्यरस्ता, प्रशासकीय इमारत, कँटिन, रीडिंग हॉल येथे उपस्थित विद्यार्थ्यांना या टोळक्याने हुसकावले. विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करत हे टोळके चारचाकी आणि दुचाकीवरून काहीवेळाने निघून गेले. दरम्यान, बजरंग दलाचे हे हुल्लडबाज तरुण आज व्हॅलेंटाईन डे असल्याच्या निमित्ताने काही प्रेमी युगुलांवर हल्ल्याच्या उद्देशाने विद्यापीठात घुसले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यापीठात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; तलवार, लाठ्याकाठ्या घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न #chhatrapatisambhajinagar#BAMUpic.twitter.com/L3fgmo1ZH3
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 14, 2024
वर्षाला २ कोटी खर्च तरीही विद्यापीठात सुरक्षेचे तीनतेरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी विद्यापीठ प्रशासन प्रतिवर्षी २ कोटी रुपये खर्च करते. प्रत्येक दिवशी तीन शिफ्टमध्ये ७५ सुरक्षारक्षक तैनात असले तरी मागील काही महिन्यांपासून विद्यापीठाच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे. परिसरात विद्यार्थिनींची छेड काढली जात असताना, तेथील सुरक्षारक्षकाने प्रशासनाला साधी माहितीही दिली नसल्याचे समोर आले होते. तसेच आज घोळक्याने तोंडाला कपडा बांधून तरुण विद्यापीठ परिसरात दहशत माजवत असताना त्यांना कोणत्याची सुरक्षारक्षकाने अडवले नाही. यामुळे विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थी संघटनांकडून ठिय्या आंदोलन
दरम्यान, कुलगुरू दालनासमोर पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, दीक्षा पवार, जयश्री शिर्के आदी विद्यार्थी नेत्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. दहशत माजवणाऱ्या या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.