- सुनील घोडकेखुलताबाद (औरंगाबाद) : खुलताबाद शहर परिसरातील शेतीमधून काढण्यात आलेली अद्रक नुकतीच दुबईला पाठविण्यात आली असून तालुक्यातून पहिल्यादांच सातासमुद्रापार अद्रक गेल्याने उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खुलताबाद शहरातील अद्रक उत्पादक शेतकरी लक्ष्मण काळे हे अद्रक पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्यांची अद्रकची शेती बघण्यासाठी जिल्हाभरातून शेतकरी येतात. काळे यांनी नुकतीच सुलतानपूर येथील हरियाली फाउंडेशनच्या माध्यमातून २०० क्विंटल अद्रक नाशिक येथे कंटनेरने लोड करून १९ नोव्हेंबर रोजी ती दुबईला पाठविली आहे. दुबईला पाठविण्यात आलेल्या अद्रकला ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. त्यावेळेस खुलताबादच्या स्थानिक बाजारात ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता.
लक्ष्मण काळे यांना खुलताबाद येथे म्हैसमाळ रोडवर १६ एकर जमीन असून ते मुख्य पीक हे अद्रकचे घेत असतात. लक्ष्मण काळे यांची अद्रक दुबईकरांची पहिली पसंती ठरली आहे. दुबईमध्ये उच्च गुणवत्ता असलेल्या शेतमालाला चांगली मागणी असते. लक्ष्मण काळे यांच्या अद्रकाची उच्च क्वालिटी असल्यामुळे हरियाली फाउंडेशनने ही अद्रक दुबईला पाठवली आहे. तेथे देखील कॉलिटी चांगली असल्यामुळे दुबईकरांची भारतीय अद्रक ही पहिली पसंती ठरल्याचे हरियाली फाउंडेशनचे सतीश शुक्ला यांनी सांगितले. लक्ष्मण काळे हे तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे मायक्रोन्यूटरण, प्लांट ग्रोथ प्रमोटर व विद्राव्य खते असे ७८ प्रकारचे उच्च क्वालिटीचे प्रोडक्ट शेतकऱ्यांना पुरवून शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अद्रक उत्पादनात वाढ होते.
अद्रकच्या कंदाची जाडी जास्तइतर अद्रकच्या तुलनेत लक्ष्मण काळे यांनी उत्पादन घेतलेल्या अद्रकच्या कंदाची जाडी आणि कंदाच्या कांडीची लांबी जास्त असून हे कंद चमकदार असल्याने अशा प्रकारच्या अद्रकची मागणी आहे. त्यामुळेच आपली अद्रक दुबईला जाण्यास पात्र ठरल्याचे लक्ष्मण काळे यांनी सांगितले.
दुबईला जाणाऱ्या अद्रकला ‘रेसिड्यू’ तपासणीतून वगळलेविदेशात रेसिड्यू फ्री’ अर्थात रासायनिक अवशेषमुक्त मालाची मागणी आहे. यासंदर्भात ‘रेसिड्यू’ ही तपासणी करण्यात येते. या तपासणीत संबंधित शेतीमाल पास झाला तरच तो इतर देशात निर्यात करता येतो. कारण विदेशातील नागरिकांकडून रसायन अंशमुक्त मालाची मागणी असतो. या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता दुबईला जाणाऱ्या अद्रकची कुठलीच ‘रेसिड्यू’ तपासणी होत नसल्याने समजले. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे अद्रक दुबईच्या बाजारपेठेत पाठविण्यास काहीच अडचण नसल्याचेही लक्ष्मण काळे यांनी सांगितले.