विद्यापीठात कागद संपला, विद्यार्थ्यांना पदव्या मिळेनात; तलाठी भरतीत निवड झालेल्यांची अडचण

By राम शिनगारे | Published: February 1, 2024 06:52 PM2024-02-01T18:52:11+5:302024-02-01T18:52:43+5:30

५ तारखेच्या खरेदी समितीमध्ये निर्णय होणार

BAMU University runs out of paper, students don't get degrees; Difficulty of those selected in Talathi recruitment | विद्यापीठात कागद संपला, विद्यार्थ्यांना पदव्या मिळेनात; तलाठी भरतीत निवड झालेल्यांची अडचण

विद्यापीठात कागद संपला, विद्यार्थ्यांना पदव्या मिळेनात; तलाठी भरतीत निवड झालेल्यांची अडचण

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदव्यांच्या छपाईचा कागद संपला आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना अर्ज केल्यानंतरही पदवी मिळत नसल्याची गंभीर चित्र निर्माण झाले आहे. नुकताच तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात उत्तीर्ण झालेल्या युवकांना पदवी अनिवार्य असल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कागद नसल्यामुळे पदव्यांचे वाटप थांबल्याच्या घटनाही आता वारंवार घडू लागल्या आहेत.

विद्यापीठातील परीक्षा विभागाकडे पदवी मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच सतत कोणत्या ना कोणत्या जागांसाठी अर्ज भरण्यासाठी, निकाल जाहीर झाल्यानंतर ओरिजल पदवीची मागणी केली जाते. त्यामुळे युवक जेव्हा गरज लागेल, तेव्हा पदवीसाठी अर्ज करतात. परीक्षा विभागातही दोन-चार दिवसांत अर्ज केल्यापासून संबंधितांना पदवी देत असते. मात्र, टीईटी पात्र युवकांना शिक्षकपदासाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना पदवीची आवश्यक होती. तेव्हाही कागदाचा पुरवठा कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. पवित्र पोर्टलवर अर्ज करण्याच्या शेवटच्या काही दिवसांत तर विद्यापीठ प्रशासनाला रात्री ११ वाजेपर्यंत परीक्षा भवन उघडे ठेवून पदव्यांचे वाटप करावे लागले होते. त्यासाठी प्रचंड रोषालाही सामोरे जावे लागले होते. त्यातून कोणताही धडा न घेता, पुन्हा आता एकदा पदव्यांचा कागद संपला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून पदवीसाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे. याविषयी विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

खरेदी समितीमध्ये होणार निर्णय
विद्यापीठाच्या खरेदी समितीची बैठक ५ जानेवारी रोजी होणार आहे. त्या बैठकीत पदवीच्या कागदाच्या खरेदीविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित पुरवठादाराकांडून निविदा मागवून कागदाच्या खरेदीचा आदेश दिला जाईल. या सर्व प्रक्रियेमध्ये १५ दिवसांपेक्षा अधिकचा कालावधीही जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात
विद्यापीठात पदवीच्या कागदाचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी तात्पुरती पदवी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत, तसेच कागद उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. कागद लवकरच उपलब्ध होऊन पदव्यांची छपाई केली जाईल.
- डॉ.भारती गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

Web Title: BAMU University runs out of paper, students don't get degrees; Difficulty of those selected in Talathi recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.