शेंद्रा ( औरंगाबाद ) : आज सकाळी मांगीरबाबा यात्रेस नवसाचा गळ टोचण्यास प्रारंभ झाला. देवस्थान समिती व ग्रामपंचायतने गळटोचणीची प्रथा बंद करण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने जबाबदारी घ्यावी अशी लेखी मागणी केली होती. मात्र, गळ टोचणीच्या ठिकाणी भाविकांची वाढती गर्दी व पोलीस व प्रशासकीय यंत्रणेच्या अनुपस्थितीने देवस्थान समितीला माघार घ्यावी लागल्याने गळ टोचणी बंदीचा फज्जा उडाला.
मांगीरबाबा यात्रेस महाराष्ट्रातील लाखो भाविकांची दरवर्षी गर्दी होते. यात नवस फेडण्यासाठी भाविक पाठीला लोखंडी गळ टोचतात. याबाबत लालसेनेने गळटोचणी बंद करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यानंतर पोलिसांनी देवस्थान समितीला तशा प्रकारची नोटीस दिली. त्याला देवस्थान समितीने संमती देखील दर्शवली. देवस्थान समिती व ग्रामपंचायतने त्यादृष्टीने जनजागृती सुरु केली. याबाबतीत प्रबोधनात्मक फलक ही लावण्यात आले.
आज यात्रा सुरु झाली असता सकाळी ९ वाजेच्या दरम्यान गळ टोचणीच्या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती. देवस्थान समिती, लालसेना व ग्रामपंचायत यांनी याला विरोध दर्शवला. मात्र भाविकांचा रेटा वाढतच होता. यातच पोलीस अथवा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तिथे उपस्थित नव्हते यामुळे समिती हतबल झाली. यामुळे समितीने ग्रामपंचायत, लालसेना व गावकरी यांच्याशी चर्चा केली. यात यात्रा सुरक्षेसाठी गळटोचणी सुरू करणेच योग्य आहे असा निर्णय समितीने घेतला. मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाजाचा रोष पत्करणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याने समितीच्या या निर्णयास ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला.
अशी आहे गळ टोचणीची प्रथा दीर्घ काळापासून मांगीरबाबा यात्रेस भाविकांची गर्दी असते. मारुती मंदिरासमोर नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या पाठीमध्ये लोखंडी गळ टोचतात. यानंतर जवळपास २०० फुटावरील मांगीरबाबाच्या मंदिरापर्यंत भाविक पळत जातात. या ठिकाणी गळ काढण्यात येतो. या आधी भाविक नवस फेडण्यासाठी जीभ व ओठातून गळ टोचत असत असे काही भाविकांनी यावेळी सांगितले.