नागद परिसरातील केळी गेली सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:25+5:302021-06-16T04:06:25+5:30
रवींद्र अमृतकर नागद : दिल्ली, मुंबईसह राज्यातील इतर भागात पोहोचलेली नागद भागातील केळीची गोडी आता सातासमुद्रापारही चाखली जाणार आहे. ...
रवींद्र अमृतकर
नागद : दिल्ली, मुंबईसह राज्यातील इतर भागात पोहोचलेली नागद भागातील केळीची गोडी आता सातासमुद्रापारही चाखली जाणार आहे. परिसरातील पंधरा ते सोळा शेतकऱ्यांची केळी आता इराण व अरब राष्ट्रांतील दुबईला पाठविली जात आहेत. यामुळे इतर शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या असून चांगल्या दर्जाची केळी उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. केळीच्या निर्यातीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना चांगला नफा मिळून आर्थिक उन्नती साधली जाणार आहे.
नागद परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. येथील केळीचा दर्जा चांगला असल्याने ती राज्यभरासह देशातील मोठमोठ्या शहरात विक्रीसाठी व्यापारी खरेदी करून नेत असतात. मात्र, येथील केळीचा दर्जा पाहून नाशिक येथील निर्यातदार कंपनीने शेतकऱ्यांना त्यांचा माल विदेशात पाठविण्यासाठी पाठबळ दिले. यानंतर त्यांनी या भागात पाहणी केल्यानंतर पंधरा ते सोळा शेतकऱ्यांच्या बागांची निवड केली आहे. यानंतर त्यांनी दर्जाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सध्या नागद येथील प्रगतशील शेतकरी रणजित राजेंद्र राजपूत व पांगरा येथील चत्तरसिंह राजपूत या शेतकऱ्यांची केळी आखाती देशात पाठविण्यात आली आहेत. स्थानिक बाजारापेक्षा शेतकऱ्यांना क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपये जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत पंधरा ते सोळा शेतकऱ्यांचा मालही इराण, दुबईला निर्यात केला जाणार आहे. यामुळे या भागातील इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दर्जेदार केळी उत्पादन करण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. यावर्षी कमी शेतकऱ्यांची केळी विदेशात जातील, तर पुढीलवर्षी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे शेतकरी नीलेश राजपूत यांनी सांगितले..
चौकट....
स्पेशल पॅकिंगसाठी आणले बंगालमधील मजूर
केळी इराण व दुबईला निर्यात करण्यासाठी ४० ते ४५ दिवस लागतात. त्यामुळे निर्यात करण्यासाठी विशेष पॅकिंग करावे लागते. सदर पॅकिंगबाबत स्थानिक मजुरांना माहिती नसल्याने केळी उत्पादक कंपनीच्या सहकार्यातून पश्चिम बंगालमधून मजूर आणण्यात आले आहेत. एकावेळी एक गाडी लोड करण्यासाठी १५-१६ जण काम करतात.
कोट
नागदची केळी जशी देशात प्रसिद्ध आहेत, तशी ती आता विदेशात पण प्रसिद्ध होतील. केळीला आम्ही रासायनिक खते फार कमी प्रमाणात देत असून जिवामृत व गांडूळ खताचा वापर केला जात आहे. सदरील केळींची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी कृषी विभागासह केळी निर्यात करणाऱ्या कंपनीचे सहकार्य लाभत आहे.
- रणजित राजपूत, केळी उत्पादक शेतकरी.
फोटो :
150621\img_20210611_131501_1.jpg
नागद परिसरातील केळी.