औरंगाबाद : सिडको एन-४ परिसरातील गुरूसहानीनगरातील बँक व्यवस्थापकाचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड पळविली. ही घटना १५ ते १९ एप्रिलदरम्यान घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
सिडको एन-४, गुरूसहानीनगर येथे राहणारे अमरदीप शैलेशकुमार खेबरागडे हे एसबीआयमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. खेबरागडे यांची पत्नी आणि मुले हे मूळ गाव असलेल्या गडचिरोली येथे गेलेले आहेत. १२ एप्रिल रोजी खेबरागडे हे नेहमीप्रमाणे बँकेत गेले. त्यावेळी त्यांचा मेहुणा घरी होता. १२ रोजी बँकेतील काम आटोपल्यानंतर खेबरागडे हे तिकडूनच गडचिरोलीला गेले. नंतर त्यांच्या मेहुण्याची परीक्षा संपल्याने १५ एप्रिल रोजी तोसुद्धा बंगल्याला कुलूप लावून गावी गेला. बंगल्यातील झाडांना पाणी घालण्यासाठी खेबरागडे परिवाराने मोलकरणीकडे चावी ठेवली होती. ती एक दिवसाआड झाडांना पाणी देण्यासाठी येते. त्यांच्या बंगल्याला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगल्याच्या चॅनलगेट आणि मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
बेडरूममधील लाकडी रॅकच्या ड्रावरमध्ये ठेवलेले ८ हजार रुपये कि मतीचे सोन्याचे पेडंट, १४ हजार रुपये किमतीचे कानातील जोड आणि एक अंगठी, ३५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र, ६ ग्रॅमची अंगठी, पाच गॅ्रमचा सोन्याचा पिळा, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी आणि रुद्राक्ष, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी, २१ ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस आणि टॉप्स अंगठी, तीन ग्रॅमचे ब्रासलेट, एक तोळ्याचे ब्रासलेट, ३० ग्रॅमचे सोन्याचे एक डायमंड असलेली अंगठी, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २० ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २ ग्रॅमचे सोन्याचे कानातील जोड आणि सहा तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, असे सुमारे २०४ ग्रॅमचे सोन्याचे एकूण १५ दागिने चोरट्यांनी चोरून नेले.