औरंगाबाद : शहरात दि. २३ ते २७ ऑक्टोबर या काळात २७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. मनपा ( Aurangabad Muncipality Corporation ) हद्दीत विविध भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये २४ आरटीपीसीआर, ३ अँटिजेन चाचणी प्रक्रियेत पॉझिटिव्ह आढळले. यापैकी ५५ जण हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये ( Corona Virus In Aurangabad ) असल्याने त्यांच्यापैकी ४९ जणांनी चाचणी केली. त्यात पाच पॉझिटिव्ह आढळले, तर सहाजणांची चाचणी केलीच नाही. हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये १० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण असल्यामुळे सणासुदीच्या काळात शहराची चिंता वाढली आहे.
रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर नागरिकांनी प्रवास टाळावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, कोविड नियमांचे पालन काळजीपूर्वक करावे, असे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. या २७ रुग्णांमध्ये ८ जणांनी बाहेरचा प्रवास केला होता. त्यात चार व्यक्ती बीड येथून प्रवास करून आलेल्या आहेत. पुणे, नगर, बुलडाणा या ठिकाणाहून प्रवास केलेला प्रत्येकी एक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील साई येथे प्रवेशासाठी आलेला जळगावातील एक विद्यार्थी अशा आठ रूग्णांनी प्रवास केल्याचे मनपाने केलेल्या अभ्यासात लक्षात आले आहे. फ्रंटलाईन वर्करमध्ये शहरातील एका शाळेतील शिक्षक, तर त्यांच्या नातेवाईकांमध्ये सेव्हन हिल येथील सुरक्षारक्षकाच्या आईला, एस. टी. विभागातील एका लिपिकाच्या पत्नीला, प्रोझोन मॉलमधील एका मुलाला अशा चारजणांना तसेच कम्युनिटी कॉन्टॅक्ट प्रकारांतर्गत ट्युशनला गेलेल्या एका विद्यार्थ्याला, गुलमंडीवर खरेदीसाठी, दसऱ्यानिमित्त कर्णपुरा येथील मंदिरात गेलेल्या अशा तीन व्यक्तींना कोरोना झाला. ७ रुग्णांची संपर्क पार्श्वभूमी समोर आलेली नाही, तर ५ जणांनी चुकीचा पत्ता दिल्याने त्यांच्याशी प्रशासनाला संपर्क साधता आलेला नाही.
अभ्यासाअंती बहुतेक रुग्ण गर्दीच्या ठिकाणी गेल्याने, प्रवास केल्याने बाधित झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. घराबाहेर जाणे खूपच महत्त्वाचे, अत्यावश्यक असेल तर कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.