काळजी घ्या! पाण्याची ५ ते ८ दिवस प्रतीक्षा, साठवलेल्या पाण्यातूनच ‘डेंग्यू’ पसरतो

By संतोष हिरेमठ | Published: May 16, 2024 03:28 PM2024-05-16T15:28:20+5:302024-05-16T15:28:44+5:30

राष्ट्रीय डेंग्यू दिन विशेष: पाणी झाकून साठविण्याकडे दुर्लक्ष; वर्षभरच ‘डेंग्यू’चे रुग्ण, स्वच्छ पाण्यातच होते या डासांची उत्पत्ती

Be careful! Waiting for water for 5 to 8 days, Dengue spreads only through stored water | काळजी घ्या! पाण्याची ५ ते ८ दिवस प्रतीक्षा, साठवलेल्या पाण्यातूनच ‘डेंग्यू’ पसरतो

काळजी घ्या! पाण्याची ५ ते ८ दिवस प्रतीक्षा, साठवलेल्या पाण्यातूनच ‘डेंग्यू’ पसरतो

छत्रपती संभाजीनगर : शहरात काही भागांत ५ दिवसांआड, तर काही भागांत ८ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणी साठवून वापरल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, याच साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात ‘डेंग्यू’च्या डासांची उत्पत्ती होते आणि नागरिकांना आजाराला तोंड द्यावे लागत असल्याची परिस्थिती आहे.

दरवर्षी १६ मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ पाळला जातो. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आणि हा आजार किती गंभीर असू शकतो, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. डेंग्यूचे रुग्ण आता वर्षभरच कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. अगदी उन्हाळ्यातही डेंग्यूच्या रुग्णांचे निदान होत आहे.

डेंग्यू होण्याची कारणे
- डेंग्यू हा आजार डेंग्यूच्या विषाणूमुळे होतो.
- हा विषाणू एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याद्वारे पसरतो.
- डेंग्यूची लागण झालेल्या दर चारपैकी एक व्यक्ती आजारी असण्याची शक्यता असते.
- डेंग्यूची लागण झालेल्या लोकांची लक्षणे सौम्य किंवा गंभीर असू शकतात.

डेंग्यूची ही आहेत लक्षणे...
- डेंग्यूचे सर्वांत सामान्य लक्षण म्हणजे ताप.
- तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या, मळमळ, वेदना, पुरळ ही लक्षणेही दिसतात.
- गंभीर लक्षणांमध्ये उलट्या होणे, पोट दुखणे, हिरड्या आणि नाकातून रक्त येणे यांचा समावेश होतो.
- रुग्णाला थकवा, अस्वस्थता आणि चिडचिडदेखील होऊ शकते.

साठवलेले पाणी झाकून ठेवा
डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. साठविलेले पाणी झाकून ठेवले पाहिजे, त्यातून त्यात डास उत्पत्ती होणे टळते, असे जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य पर्यवेक्षक बी. बी. पाटील म्हणाले, तर डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत जनजागरण करणार आहोत, असे जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले यांनी सांगितले.

डेंग्यूची रुग्णसंख्या
-२०१९ : ५२७
-२०२० : ४८
-२०२१ : ११७
- २०२२ : १०८
-२०२३ : ४१५
- २०२४ : २९ ( १४ मे पर्यंत)

Web Title: Be careful! Waiting for water for 5 to 8 days, Dengue spreads only through stored water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.