- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : आता खबरदार! जटिल गुन्ह्यात सबळ पुराव्याअभावी आरोपी सुटून पुन्हा तो निर्ढावल्याच्या आर्विभावात सर्वसामान्यांत वावरतो, अशा मस्तवालांना चाप बसावा म्हणून अमेरिकेतील तंत्रज्ञानाचा उपयोग मुंबईनंतर आता औरंगाबाद क्षेत्रात होणार आहे. गंभीर गुन्ह्यात परिस्थितीजन्य पुरावे जमा करण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्रात ‘आय-बाइक’ पथकाचा समावेश करण्यात आला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यासाठी तसेच खुनासारख्या गंभीर घटनास्थळी शोधपथक तातडीने पोहोचून तंत्रशुद्ध पद्धतीने पुरावे गोळा करणार आहे. या ‘आय बाइक’वर वायरलेस, जीपीएस यंत्राची सुविधा देण्यात आलेली आहे. विशेष पथकातील अधिकारी आणि कर्मचा-यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिका-यांकडे एक बाइक देण्यात आली आहे. हा प्रयोग तूर्तास प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.
गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यानंतर सबळ पुरावे नसल्याच्या कारणामुळे तसेच घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे पोलीस तसेच घरातील व्यक्ती किंवा बघ्यांच्या गर्दीतून बाधित झाल्याने शोधकार्यात अडथळे येतात. परंतु; गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला, तर अनेक जटिल गुन्ह्यांची उकल करणे सोपे होऊ शकते. यामुळेच गुन्ह्यातील गुंता सुलभ व्हावा व त्यातील पुरावे गोळा करण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्रात ‘आय बाइक’ अर्थात ‘गुन्हे शोध दुचाकी पथक स्थापन’ करण्यात आले आहे. यानुसार औरंगाबाद क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्याला पाच दुचाकी प्रायोगिक तत्त्वावर दिल्या गेल्या आहेत. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी, चार पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आधुनिक किटने सज्ज ' आय बाईक'अमेरिकन पोलिंगच्या धर्तीवर ‘आय बाइक’ संकल्पना हाती घेण्यात आली आहे. या पथकाकडे एक आधुनिक किट असलेली दुचाकी देण्यात आली आहे. त्या दुचाकीत घटनास्थळावर पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे यंत्र राहणार असून, घटनास्थळ परिसरात कोणी येऊ नये म्हणून तो परिसर त्वरित सील करण्यात येणार आहे. घटनास्थळाच्या अवतीभोवती प्रतिबंधित क्षेत्र पिवळ्या रंगाची पट्टी, हातमोजे इत्यादी महत्त्वाच्या साहित्याचे किट तयार राहणार असून, घटनास्थळी पुरावे जमा करण्यासाठी लागणारे साहित्य त्या दुचाकीच्या डिक्कीत राहणार आहे. एखाद्या ठिकाणी खून झाला असेल, तर त्या ठिकाणावर शोधपथक तातडीने पोहोचून तंत्रशुद्ध पद्धतीने पुरावे गोळा करणार आहे. या ‘आय बाइक’वर वायरलेस, जीपीएस यंत्र लावलेले आहे. पथकातील अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिका-यांकडे एक बाइक दिली आहे. औरंगाबादला सहा, जालना पाच, बीड चार, उस्मानाबाद चार, अशा पद्धतीने बाइकचे वाटप करण्यात येणार आहे.
...आता गुन्हेगार सुटणार नाहीतखून अथवा एखाद्या गुन्ह्यात पुरावा न मिळाल्यास गुन्हेगार सुटून जातो. त्यामुळे पोलिसांकडून आपत्तीग्रस्तांच्या कुुटुंबियांना न्याय देता येत नसल्याची फक्त खंत व्यक्त केली जाते; परंतु आता तसे होणार नाही. ‘आय बाइक’ बारीकसारीक पुरावे जमा करून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर करणार आहे. पोलीस पोहोचण्या अगोदरच्या गर्दीने घटनास्थळावरील पुरावे नष्ट होतात. परिणामी, न्यायालयात प्रकरणातील आरोपींना याचा फायदा मिळतो. अनेक गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे, असे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे म्हणाले.