औरंगाबाद : वाहतुकीचे नियम मोडणे वाहनचालकांना आता चांगलेच महागात पडणार आहे. सिग्नल तोडणे, दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, असे प्रकार करताना आढळून आल्यास वाहन चालविण्याचा परवाना पंधरा दिवस ते तीन महिन्यांपर्यंत निलंबित होणार आहे. नव्या नियमानुसार शहर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून कारवाईला सुरुवात केली असून, २० चालकांचे लायसन्स जप्त करून निलंबित करण्याचे प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
शहरात वाहनांची संख्या १३ लाखांवर आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था उत्तम राहावी याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर ४५ वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. वाहतूक नियमन करण्यासाठी सुमारे साडेतीनशे वाहतूक पोलीस शहरात कार्यरत आहेत. वाहतूक पोलिसांसमोर काही जण बिनधास्त सिग्नल तोडून पळतात. सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका किती तरी पटीने वाढतो. यासोबत ट्रिपल सीट दुचाकीचालक, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे, अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून नियमित दंडात्मक कारवाई केली जाते.
शिवाय नियम मोडून वाहन चालविताना सेफ सिटी प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले त्या वाहनचालकांवर घरपोच दंडाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत; मात्र दंडात्मक कारवाईचा वाहनचालकांवर परिणाम होत नसल्याचे निदर्शनास आल्याने नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांचा वाहन चालविण्याचा परवानाच निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
या शासन निर्णयाची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली. पहिल्या टप्प्यात वाहतूक सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट दुचाकीचालक आणि राँग साईडने वाहन पळविणाऱ्यांचे लायसन्स जप्त करून निलंबित करण्यात येत आहे.
दोन दिवसांत २० जणांवर कारवाईवाहतूक सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट दुचाकीचालक आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांचे लायसन्स पंधरा दिवस ते तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेकडून आरटीओला पाठविला जात आहे. दोन दिवसांत २० जणांचे लायसन्स जप्त करण्यात आले असून, त्यांचे लायसन्स निलंबित करण्याची कार्यवाही सुरू आहे.- डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर