वाहनधारकांनो सावधान! जालना रोडलगतचा भाग खचला; गॅस पाईपलाईन बुजवण्यात हलगर्जीपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 08:38 AM2022-06-25T08:38:40+5:302022-06-25T09:01:24+5:30
वाहणाऱ्या पाण्यात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता...
- श्रीकांत पोफळे
करमाड ( औरंगाबाद) : मागील काही महिन्यांपूर्वी जालनारोडच्या बाजूने सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, पाइपलाईन बुजवत असताना दबाईकरणाकड अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. योग्य प्रकारे दबाई न झाल्यामुळे जालना रोडच्या लगतचा पाईपलाईनवरील भाग खचला असून तीनचार फुटापर्यंत खोल खड्डे पडलेले आहेत. शेंद्रा पाटीवर या खड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जोरदार पावसात रोडच्या बाजूने पाणी वाहतांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.
मागील सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद-जालना महामार्गाला लागून सीएनजी गॅस ऑनलाईन पुरवठा होण्याच्या दृष्टीने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. औरंगाबाद जालना महामार्गावर या पाईप लाईनमुळे सर्वच पेट्रोल पंपावर २४ तास सीएनजी उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे. वाहनधारकांना तासन्तास लाईनीत उभा राहण्याच्या कटकटीपासून सुटका मिळणार आहे. त्यादृष्टीने हे काम देखील महत्त्वाचे होते. मात्र, हे करत असताना संबंधित ठेकेदाराने पाइपलाइन टाकल्यानंतर नाली बुजविण्याच्या कामाचे दबाईकरण योग्यरीत्या न केल्यामुळे औरंगाबाद- जालना महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
विशेष म्हणजे, या पाईपलाईनचे काम होत असतानाच जवळपास 15 जणांचे अपघाती बळी गेले आहेत. आता रस्त्या लगतचा भाग खचल्याने पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांसह पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.