औरंगाबादेत भाकपचा विभागीय मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:46 AM2018-04-18T00:46:01+5:302018-04-18T00:48:17+5:30
आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भाकपचा विभागीय मोर्चा भर उन्हातच विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चेकºयांच्या हातात पक्षाचा विळा-कणीस निशाणीचा लालबावटा होता व ते उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भाकपचा विभागीय मोर्चा भर उन्हातच विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चेकºयांच्या हातात पक्षाचा विळा-कणीस निशाणीचा लालबावटा होता व ते उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते. महिलांचा लक्षणीय सहभाग हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांतून मोर्चेकरी आले होते.
रणरणत्या उन्हात दुपारी १.३० च्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. लालबावट्यांमुळे मोर्चा लक्ष वेधून घेत होता. नूतन कॉलनी, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक मार्गे हा मोर्चा दुपारी ३.३० च्या सुमारास विभागीय आयुक्तांच्या कार्यालयावर धडकला. तेथे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. मनोहर टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा झाली.
सभेत भाकपचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे, राष्टÑीय कार्यकारिणी सदस्य कॉ. भालचंद्र कांगो, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राम बाहेती, राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. देवीदास जिगे (जालना) व जोतिराम हुरकडे (बीड) यांची घणाघाती भाषणे झाली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना एका शिष्टमंडळाने आपले सविस्तर निवेदन सादर केले. मोर्चात शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कष्टकरी, गायरानधारक, वनजमीनधारक, आदिवासी, भिल्ल, नाथजोगी, रोहयो मजूर, अंगणवाडी- आशा- पार्ट टायमर- रोजगार सेवक, अंबड नगर परिषदेचे सफाई कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, मोलकरीण,फेरीवाले, असंघटित कामगार, भूमिहीन, महिला, विद्यार्थी, युवक आदींचा सहभाग राहिला.
कॉ. अश्फाक सलामी, कॉ. शिवाजी फुलवाले, कॉ. भास्कर लहाने, कॉ. माधुरी क्षीरसागर, पंकज चव्हाण, भाऊ प्रभाळे, रशीद पठाण, अशोक जाधव, कैलास कांबळे, विलास शेंगुळे, कॉ. गणेश कसबे,भाऊसाहेब शिंदे, काकासाहेब निघोटे, भाऊसाहेब रोठे, कॉ. तारा बनसोडे, माया भिवसाने, अनिता हिवाळे, मनीषा भोळे, रतन अंबिलवादे, महेबूब कुरेशी, कॉ. सरिता जिगे, आलमनूर शेख, रंजना राठोड, कॉ. भगवान भोजने, कॉ. बुद्धप्रिय कबीर आदींनी मोर्चासाठी परिश्रम घेतले.
मोर्चेकºयांच्या मागण्या अशा...
शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, मनरेगांतर्गत कामे सुरूकरा, बेघरांना घरे द्या,घरांसाठी जमीन द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकºयांना न्याय द्या, गारपीट, बोंडअळीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई द्या, असंघटित कामगारांना किमान वेतन १८ हजार रु. करा, सर्वांना समान शिक्षण द्या, भूमिहीनांना जमीन द्या, बेरोजगारांना रोजगार द्या, शेतकºयांना पुरेसा वीजपुरवठा करा.