मोठी बातमी! औरंगाबाद महापालिकेची निवडणूक थेट पुढील वर्षीच जाणार, दुसऱ्या टप्प्यात समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 04:12 PM2022-05-12T16:12:44+5:302022-05-12T16:13:40+5:30
१४ महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात, औरंगाबादचा दुसऱ्या टप्प्यात समावेश
औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात केली. राज्यातील १४ महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार असून, औरंगाबादसह इतर महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होईल, हे निश्चित. राज्यातील १४ महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवातही केली.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका घेण्याचे आदेश ४ मे रोजी निवडणूक आयोगाला दिले. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच निवडणूक आयोगाने ११ मार्च २०२२ पर्यंत निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली कारवाई पुढे सुरू केली. १० मे राेजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांसाठी एक आदेश काढला. या आदेशात संबंधित महापालिकांची अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. प्रभाग रचना राजपत्रात अंतिम केल्यानंतर लगेच निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो.
पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळा संपताच त्या होतील, अशी अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय पहिल्यांदाच राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे आतापर्यंतचे तरी चित्र आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी शासनाने निवडणुका घेण्यासंबंधीचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले होते. मात्र ते कायद्याच्या चौकटीत बसले नाही.
१४ महापालिका कोणत्या?
नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, बृहन्मुंबई व ठाणे.
दुसऱ्या टप्प्यातील महापालिका
भिवंडी-निझामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, मालेगाव, परभणी, औरंगाबाद, नांदेड, नांदेड- वाघाळा, लातूर, चंद्रपूर.
औरंगाबादची स्थिती
राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद महापालिका प्रशासनाला नव्याने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टीने मंगळवारपासून प्रशासन कामाला लागले आहे. १७ मे पर्यंत प्रारूप आराखडा आयोगाला सादर करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. नियोजित वेळेत आराखडा तयार न झाल्यास मनपाकडून आणखी वेळ वाढवून मागितला जाईल.