फुलंब्री : तालुक्यातील बाबरा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनेल रिंगणात समोरासमोर उभे ठाकले आहे. या निवडणुकीत भाजप व काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने निवडणुकीत रंगत चढली आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील काहीजणांनी प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही.
बाबरा ग्रामपंचायतमध्ये पाच वाॅर्ड असून, सदस्य संख्या १३ आहे. गावात दोन प्रमुख राजकीय पक्षांचे प्राबल्य आहे. यंदा दोन पॅनेल समोरासमोर उभे ठाकले आहेत. एक उमेदवार बिनविरोध निवडून आला असून, दोन पॅनेलकडून २५, तर दोन अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात होती. जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र जैस्वाल यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावून उमेदवार निवडले. यात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना समाविष्ट केले. शेवटपर्यंत प्रयत्न झाले, पण भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी आपली वेगळी चूल थाटल्याने त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. भाजप-काँग्रेसचे संयुक्त पॅनेल व दुसऱ्या पॅनेलने जाहीरनामा तयार केलेला नाही. तसेच दोन्हीही पॅनेलच्या बॅनरवर राजकीय नेत्यांचे फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चौकट
ग्रामपंचायतीची परिस्थिती
एकूण सदस्य संख्या- १३, एकूण मतदार ३८४९ असून यात महिला १८०८, तर पुरुष २०४१ मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीत विद्यमान तीन सदस्य रिंगणात असून, सर्वांत कमी वयाची महिला उमेदवार सीमा अंकुश बनसोड आहेत. सर्वांत जास्त वयाचे राधाकृष्ण मैंद व माधवराव काळे हे दोघे उमेदवार निवडणुक लढवित आहेत.
फोटो कॅप्शन : बाबरा ग्रामपंचायत इमारतीचा फोटो