लालखाँ पठाण, गंगापूरबंबसाहेब आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळातली विकास कामे दाखवा, तालुका विकासाची ब्ल्यू प्रिंट कुठंय, असे खडे सवाल करून जनतेने आ. बंब यांना आमसभेत भंडावून सोडले. जनतेचे फोन घेत जा असा अधिकाऱ्यांना आमसभेत दम भरणाऱ्या बंब यांनाही लोकांनी तोच प्रश्न विचारल्याने अडचणीत आलेल्या आमदारांनी दिवसभर चालणारी आमसभा दोन तासांतच गुंडाळली.गेल्या पाच वर्षांत कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा ठराव, आतापर्यंत फार्सच ठरला. प्रत्यक्षात कुणावरही कारवाई झालीच नाही. प्रत्येक आमसभेत विचारले गेलेले प्रश्न सुटलेच नाहीत. आ. बंब यांचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याचे आमसभेत दिसून आले. ‘येरे माझ्या मागल्या’ याप्रमाणे कागदोपत्री उद्दिष्टपूूर्ती दाखविण्याचे काम अधिकारी वर्गाने बजावल्याचे जाणवले. गंगापूर तालुक्याचा विकास आराखडा (ब्ल्यू प्रिंट) कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात तालुक्यात मैलाचा दगड ठरेल, असे कामच झाले नाही. त्यामुळे जनता पुन्हा ‘नव्या भिडूचा’चा शोध घेईल. मागील निवडणुकीत जनतेने याच मानसिकतेतून गंगापूर तालुक्याला आ. बंब यांच्या रुपाने नवा चेहरा दिला. पण जनतेचा भ्रमनिरास झाला. निवडणूक काळात दिलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या. बंब यांना तालुक्याच्या जनतेचा विसर पडला की काय, हे त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसते. ते नेहमीच मतदारसंघाबाहेरील प्रश्नावर बोलताना दिसतात. ते गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार की जिल्ह्याचे, हा प्रश्न जनतेला पडला आहे. आपल्या राहत्या गावातच वर्षानुवर्षे तहानेने व्याकूळ झालेल्या जनतेसाठी अगोदर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी शहरातील जनतेचा पाणी प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटू लागला आहे. प्रश्नांचा भडिमार...आमसभेत नेहमीच विकास कामांबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांबाबत जनतेची मुस्कटदाबी करणाऱ्या बंब यांना आमसभेत अॅड. महेंद्र राऊत यांनी प्रश्नांचा भडीमार करून निरुत्तर केले. साहेब, तुमच्या मागील निवडणुकीचा नारा ‘चला लढू या, बदल घडवू या’ यानुसार काय बदल घडविला, स्पष्ट करा, म्हटल्यावर बंब गोंधळून गेले. तोच दुसरा प्रश्न तुम्ही फोन न उचलण्याचे व गंगापूर संपर्क कार्यालयात हजर न राहण्याचे कारण काय? अधुरी पडलेली विकास कामे होणार कधी? आदी प्रश्नांचा भडीमार होत असतानाच मी सतत मिटिंगमध्ये असतो. विधानसभेत असतो. आमसभेत असतो, असा बचाव केला. पण विविध स्तरांतील प्रश्नांचा भडीमार वाढत गेल्याने शेवटी दोनच तासांत आमसभा आटोपती घेऊन बंब निघून गेले.
बंबसाहेब विकासाची ब्ल्यू प्रिंट कुठंय?
By admin | Published: July 30, 2014 1:06 AM