मोमबत्ता तलावातील नौकाविहारचा मुहूर्त टळला; आचारसंहितेपूर्वी सुरू होईल का?
By विजय सरवदे | Published: January 31, 2024 03:34 PM2024-01-31T15:34:11+5:302024-01-31T15:35:01+5:30
पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांची वेळ जुळली नसल्यामुळे प्रजासत्ताकदिनी नौकाविहाराचा प्रारंभ टळल्याची कुजबुज
छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतीक्षित मोमबत्ता तलावात नौकाविहार सुरू होण्याचा २६ जानेवारीचा मुहूर्त टळल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांची वेळ जुळली नसल्यामुळे प्रजासत्ताकदिनी नौकाविहाराचा प्रारंभ टळल्याची कुजबुज आहे.
दौलताबाद किल्ल्याजवळ निसर्गरम्य ठिकाणी मोमबत्ता तलावात नौकाविहारचा आनंद पर्यटक व नागरिकांना घेता यावा, यासाठी मागील ८-१० वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अनेक तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. अखेर विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या प्रयत्नाला यश आले. सन २०१६-१७ मध्ये या प्रकल्पासाठी शासनाने सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून ६३ लाख रुपये खर्च करून जि.प. प्रशासनाने तिकीटघर, बोटिंगतळ, वाहनतळ, कॅन्टीनची उभारणी केली होती. अलीकडेच दौलताबाद, वेरुळ, म्हैसमाळ, सुलीभंजन, खुलताबाद येथील ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी, या हेतूने तेथील पायाभूत सुविधा व परिसर विकासासाठी जिल्हा परिषदेने ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यापैकी दौलताबादजवळील मोमबत्ता तलाव परिसर विकासासाठी शासनाने १० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यापैकी साडेचार कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यानंतर, जिल्हा परिषदेने बोटिंगसाठी निविदा प्रसिद्ध केली. त्यानुसार, महाराणा एजन्सी सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर्स या संस्थेला हे कंत्राट निश्चित झाले. नौकाविहाराची तयारी पूर्ण झाली असली, तरी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नौकाविहार सुरू व्हावी, अशी अपेक्षा हौशी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भुमरे - शिरसाटांची वेळ हवी
पालकमंत्री भुमरे व आमदार संजय शिरसाट यांनी जिल्हा परिषदेने सादर केलेला ग्रामीण पर्यटनाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शासनाकडे जोर लावला होता. त्यामुळे या दोघांच्या हस्ते नौकाविहाराचे उद्घाटन व्हावे, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. मात्र, कार्यबाहुल्यामुळे त्या दोघांच्या वेळेचा ताळमेळ लागत नाही. लवकरच नौकाविहाराचे उद्घाटन होण्यासाठी दौलताबाद ग्रामपंचायत आणि संबंधित कंत्राटदार संस्था प्रयत्नशील असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.