औरंगाबाद : मनपाचे नवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी अधिकाऱ्यांनी रांगच लावली होती. नगररचना विभागाचे सहसंचालक आर. एस. महाजन कॅरिबॅगसह पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या दालनात पोहोचले. आयुक्तांनी पुष्पगुच्छ स्वीकारला, परंतु महाजन यांना प्लास्टिक वापरल्याबद्दल पाच हजारांचा दंड ठोठावला.
आयुक्त पाण्डेय यांच्या आगमनापूर्वीच मनपा मुख्यालयातील शौचालये स्वच्छ करून घेण्यात आली. भिंती पाण्याने धुवून काढल्या होत्या. सकाळी आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागप्रमुख शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन दालनात दाखल होत होते. महाजन प्लास्टिकच्या कॅरिबॅगमधून पुष्पगुच्छ घेऊन आले. हे निदर्शनास येताच पाण्डे यांनी त्यांना दंड ठोठावला. त्यानुसार महाजन यांनी पाच हजार रुपये भरुन दंडाची पावती घेतली.
पावणेदोन कोटींचा महसूल
महापालिकेने कॅरिबॅग बंदीसाठी शहरात व्यापक उपाययोजना केल्या. या कामासाठी माजी सैनिकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. माजी सैनिकांनी वेळोवेळी मोहीम राबवून व्यापारी, नागरिकांकडून तब्बल पावणेदोन कोटींचा महसूल जमा केला. यानंतरही शहरात राजरोसपणे प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर करण्यात येत आहे. अधिकाºयाच दंड ठोठावून आयुक्तांनी कॅरिबॅगप्रश्नी आपला अजेंडा स्पष्ट केला आहे.