भराडी ( औरंगाबाद ) : उपळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघदावाडी येथील तुषार विठ्ठल महेर या मुलाचा सिल्लोड येथे चार दिवसांपूर्वी वळण रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता. वाघदावाडीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क मृतदेह खाटेवरून नेण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.
उपळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघदावाडीची लोकसंख्या तिनशेपेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायतमध्ये येथील एक सदस्य निवडून येतो. मात्र, या गावात पाण्याची सोय नाही. आपापल्या परीने नागरिक पाण्याची व्यवस्था करतात. येथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खाटेचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात तर महिलांसह लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. चार दिवसांपूर्वी वाघदावाडीच्या तुषार विठ्ठल महेर या मुलाचा सिल्लोड येथे रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावी नेण्यासाठी कुटुंबीयांना खाटेचा आधार घ्यावा लागला. यामुळे गावात रस्ता कधी होईल, अशी विचारणा गावकरी करीत आहेत.
रस्ता नसल्याने महेर कुटुंबातील तिघांचा मृत्यूअपघातात मयत तुषार विठ्ठल महेर या मुलाच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा रस्ता नसल्याने मृत्यू झालेला आहे. यातील एकजण सर्पदंश झाल्यानंतर वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकला नाही. तर कुटुंबातील दोघांनी विषारी औषध प्राशन केले होते, वेळेवर रुग्णालयात पोहोचविता न आल्याने त्यांचाही मृत्यू झाला होता.
रस्त्याचा निधी परत गेलानागरिकांच्या मागणीनुसार वाघदावाडी ते उपळी असा रस्ता करण्यासाठी प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाला होता. मात्र, काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात हा रस्ता अडविल्याने तो होऊ शकला नाही.
रस्त्याचा वाद उपजिल्हाधिकाऱ्यांकडेउपळी ते वाघदावाडी रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविल्यानंतर तहसील प्रशासनाने रस्ता करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना समजावून सांगितले. मात्र काही शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केल्याने रस्त्याचे काम होऊ शकले नाही. आमची एकच मागणी आहे की आम्हाला जाण्या-येण्यासाठी रस्त्याची सोय करून द्यावी.-इंदलसिंग हारचंद महेर, रहिवासी, वाघदावाडी