अंबाजोगाईत धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:29 AM2017-09-29T00:29:09+5:302017-09-29T00:29:09+5:30
दीनदयाळ कॉलनीतील एका शिक्षकाच्या दाराच्या कोंड्यावर टॉवेल गुंडाळून कोंडा तोडत चोरट्यांनी कपाटामधील ८ तोळयांचे दागिने व नगदी ८० हजार रु पये लंपास करून पोबारा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई :गेल्या महिनाभरापासून अंबाजोगाई शहरामध्ये चोºयांचे सत्र सुरूच असून यापैकी एकाही चोरीचा तपास पोलीस यंत्रणेला लावता आलेला नाही. गुरूवारी दिवसाढवळ्या दीनदयाळ कॉलनीतील एका शिक्षकाच्या दाराच्या कोंड्यावर टॉवेल गुंडाळून कोंडा तोडत चोरट्यांनी कपाटामधील ८ तोळयांचे दागिने व नगदी ८० हजार रु पये लंपास करून पोबारा केला. या चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
परळी येथील माध्यमिक शिक्षक दीपक त्रिंबक अप्पा नावंदे हे अंबाजोगाई येथील दीनदयाळ कॉलनीत अजय पांडे यांच्या घरी किरायाने राहतात. गुरूवारी सकाळी मित्रांसोबत नावंदे हे तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला गेले होते. घरी लहान मूल असल्याने पत्नी व मुलगा घरी थांबले होते. १० वाजेच्या सुमारास लहान बाळाला ताप आल्याने सदरील महिलेने घराला कुलूप लावून बाळाला रूग्णालयात नेले. घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा आणि कुलूप टॉवेलने गुंडाळून तोडून टेबलवर ठेवला आणि आत प्रवेश केला. कपाटामधील ४ तोळ्याचे गंठन, ५ ग्रामचे लहान मुलाचे लॉकेट, ६ ग्रामच्या अंगठ्या, कानातले ५ ग्रामचे फुले व नगदी ८० हजार रु पये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. १ वाजता सदरील महिला घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत शेजारील काम सुरु असलेल्या मजुरांना विचारणा केली, परंतु त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. या चोरीमध्ये अंदाजे अडीच लाख रूपयंचा ऐवज लंपास झाला आहे. बीडच्या श्वानपथकाला पाचारण केले आहे. घराशेजारील सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे नजरकैद झालेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. शहरात रात्रीच्या व सकाळच्या चोºया नित्याचे बनले असताना गुरूवारी दिवसाढवळ्या धाडसी चोरी झाल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.