दहा टक्के महिलांमध्ये आढळला ‘ब्रेस्ट कॅन्सर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 06:58 PM2019-05-26T18:58:57+5:302019-05-26T18:59:11+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) क्ष-किरण विभागातर्फे वर्षभरात तपासणी केलेल्या महिलांपैकी १० टक्के महिलांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’चे निदान झाले
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) क्ष-किरण विभागातर्फे वर्षभरात तपासणी केलेल्या महिलांपैकी १० टक्के महिलांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’चे निदान झाले. ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात समाजात जनजागृती वाढत असून, महिला स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत आहेत, असे क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी सांगितले.
क्ष-किरण विभागातर्फे १६ जून रोजी ‘औरंगाबाद ब्रेस्ट इमेजिंग कोर्स’ या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘ब्रेस्ट कॅन्सर’वर विचारमंथन करण्यात येणार आहे. याप्रसंगी कॅ न्सरवर विजय मिळविलेल्या सायली राज्याध्यक्ष, डॉ. बीजल झंकारिया, डॉ. सबिता देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. अनघा वरूडकर, डॉ. अनिल जोशी, डॉ. अरुणा कराड यांची उपस्थिती राहील.
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे अधिक प्रमाण आहे. पूर्वी पन्नाशीनंतर आढळून येणारा ब्रेस्ट कॅन्सर हा अलीकडे तिशीमध्येही आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रेस्ट कॅन्सरचे अचूक निदान करणारे घाटीतील डिजिटल मॅमोग्राफी हे उपकरण समाजातील सर्व स्तरातील महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. याच डिजिटल मॅमोग्राफीच्या साहाय्याने अनेक महिलांची तपासणी झाली आणि स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या अनेक महिलांवर वेळीच उपचार करणेही त्यामुळेच शक्य झाले आहे.
संपूर्ण ‘ब्रेस्ट इमेजिंग युनिट’ असलेले घाटी हे राज्यातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. ब्रेस्ट कर्करोगाच्या निदानासाठी मॅमोग्राफी हे उपकरण वैद्यकशास्त्रानुसार अतिशय उपयुक्त मानले जाते. क्ष-किरण विभागात तब्बल ३५ लाख रुपयांचे मेमोग्राफीसंदर्भात अत्याधुनिक सॉफ्टवेअर कार्यान्वित केले. अतिसूक्ष्मरीत्या तपासणीच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरत आहे, असे डॉ. रोटे यांनी सांगितले.
लक्षणे नसतानाही केली तपासणी
घाटी रुग्णालयात वर्षभरात दीड हजार महिलांची मॅमोग्राफी तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे कोणतीही लक्षणे नसताना १२५ महिलांनी स्वत:हून तपासणी करून घेतली. त्यातील ६ महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले, असेही डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी सांगितले.