वेळेत फ्लॅट न देणाऱ्या बिल्डरला महारेराचा फटका; व्याजासह द्यावी लागणार संपूर्ण रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 05:24 PM2018-11-07T17:24:38+5:302018-11-07T17:25:32+5:30
बिल्डरला ही संपूर्ण रक्कम एक महिन्यात द्यावी लागणार आहे.
औरंगाबाद : करारानुसार तक्रारदारांना निर्धारित वेळेत फ्लॅटचा ताबा न देणाऱ्या बिल्डरने चार तक्रारदारांना त्यांची संपूर्ण रक्कम २ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश पुणे येथील महाराष्ट्र स्थावर मालमत्ता संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) दिला आहे. त्याचप्रमाणे वरील चौघांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून ७० हजार ते एक लाख रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणूनही प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचे आदेशात म्हटले आहे. बिल्डरला ही संपूर्ण रक्कम एक महिन्यात द्यावी लागणार आहे.
तक्रारदार दिनेश राठोड, दीपक जाधव, सुनील गवळी आणि ज्योती त्रिभुवन यांनी औरंगाबादेतील मिटमिटा येथील मे. नरहरी बिल्डर्सचे भागीदार अनिल सोनवणे आणि प्रफुल्ल ब्रह्मेचा यांच्या वरील प्रकल्पात प्रत्येकी एक फ्लॅटची नोंदणी केली होती. त्या सर्वांचा नोंदणीकृत करार झाला होता. त्यानुसार १८ महिन्यांत त्यांना फ्लॅट देण्याचे करारात म्हटले होते; परंतु वरील चौघांना निर्धारित वेळेत फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. म्हणून त्या चौघांनी अॅड. आनंद मामीडवार यांच्यामार्फत ‘महारेरा’कडे तक्रार दाखल केली होती.
सुनावणीअंती प्राधिकरणाने दिनेश राठोड यांना एकूण ११ लाख ५१ हजार ५०० रुपये २ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला. राठोड यांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेशात म्हटले आहे. ज्योती त्रिभुवनला एकूण ११ लाख ५० हजार रुपये २ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला.
त्रिभुवन यांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून ९० हजार रुपये, तसेच दीपक जाधव यांना एकूण १४ लाख ९४ हजार ९३८ रुपये २ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला. जाधव यांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून ८५ हजार रुपये, त्याचप्रमाणे सुनील गवळी यांना एकूण ९ लाख ९२ हजार १८४ रुपये २ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला. गवळी यांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून ७० हजार रुपये देण्याचे आणि तक्रारीचा खर्च म्हणूनही प्रत्येक तक्रारदाराला २० हजार रुपये देण्याचे आदेशात म्हटले आहे.