औरंगाबाद : पिसादेवी परिसरातील पुलाच्या खाली खून करून टाकलेल्या रामचंद्र जायभाये (रा. आईसाहेबनगर, पिसादेवी रोड) यांच्या खून प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. खुनाची सुपारी घेणारे आणि रामचंद्र यांच्या पत्नीचा बाॅयफ्रेंड हे तिघेही शहराबाहेरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्या ठिकाणी दादागिरी करायचे, स्टाईल मारीत आपण दादा बनल्याचा भास त्यांना होत होता. नव्याने दादा बनल्यानंतर काही तरी ‘भव्यदिव्य’ केले पाहिजे, त्यातूनच खुनाची सुपारी घेतल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील कुंभेफळ येथील रामचंद्र जायभाये हा एका गाडीवर चालक होता. तो पत्नी मनीषा व दोन वर्षांच्या मुलासह पिसादेवी येथील सासूच्या घरी राहत होता. रामचंद्रचा चालक मित्र गणेश ऊर्फ समाधान फरकाळे हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत पार्टटाईम नोकरी करायचा. त्यातून रामचंद्रसोबत त्याची मैत्री जमली. त्याचे रामचंद्रच्या घरी येणे-जाणे होते. नवऱ्याच्या मित्रासोबत मनीषाचे सूत जुळले. या संबंधात रामचंद्र अडसर ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी दीड महिन्यापूर्वीच घेतला होता, अशी माहिती आरोपींच्या मोबाईल चॅटमधून समोर आली.
रामचंद्रला संपविण्यासाठी गणेशने कॉलेजमधील मित्र राहुल सावंत व निकितेश मगरे या दोघांना सुपारी दिली. या दोघांना अभियांत्रिकी महाविद्यालयात दादागिरीचा अनुभव होता. रामचंद्रच्या पत्नीने १ लाखाच्या सुपारीपैकी दोघांना २५ हजार दिले होते. तिची आई गावी गेल्याची संधी साधून तिने प्रियकर गणेशसह राहुल आणि निकितेश यांना बोलावून घेतले. घरातच चौघांनी मिळून रामचंद्रची हत्या केली. शव नदीत टाकून दिले. नंतर दोघांनी एका वाहनातून मृताचे कपडे नेऊन डोंगरात जाळले. साताऱ्याच्या डाेंगरात मोबाईल फोडून फेकून दिला. या सर्व वस्तू चिकलठाण्याचे निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक बालाजी ढगारे यांच्या पथकाने हस्तगत केल्या.
पुराव्याशिवाय चौकशी नकोचौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर मनीषा पोलिसांना तुमच्याकडे माझ्याविषयी पुरावे नाहीत, त्यामुळे तुम्हाला मला विचारता येणार नाही, हात लावता येणार नाही, असे सांगत होती. या प्रकरणातून आणखी एक मोठा ट्विस्ट पुढे येण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सबळ पुरावे जप्तचिकलठाणा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत खुनाचा उलगडा केला. याशिवाय आरोपींना शिक्षा होण्याएवढे पुरावे जमा केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.