मोटारसायकल घेण्यासाठी केली पुंडलिकनगरमध्ये घरफोडी
By | Published: November 22, 2020 09:02 AM2020-11-22T09:02:20+5:302020-11-22T09:02:20+5:30
औरंगाबाद : सिडको एन-१ या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या तरुणाने मोटारसायकल खरेदी करण्यासाठी उघड्या घरातून २८ ग्रॅमची सोन्याची दोन ...
औरंगाबाद : सिडको एन-१ या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या तरुणाने मोटारसायकल खरेदी करण्यासाठी उघड्या घरातून २८ ग्रॅमची सोन्याची दोन बिस्किटे चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. श्रीमंत वडिलांचा मुलगा असलेला आरोपी तरुण प्रोझोन मॉलमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.
प्रथमेश ऊर्फ प्रेम दत्तप्रसाद व्यास (२०, रा. सिडको एन-१ ) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर परिसरातील गजानननगर येथील राणी शशिकांत शिंदे यांच्या घरातील कपाट उघडून २० ग्रॅम आणि ८ ग्रॅमचे सोन्याची दोन बिस्किटे चोरट्यांनी पळविल्याचे गुरुवारी समोर आले. याप्रकरणी शिंदे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती. सिडको पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, हवालदार नरसिंग पवार, सुभाष शेवाळे, सुरेश भिसे आणि स्वप्नील रत्नपारखी हे शनिवारी (दि.२१) गस्तीवर होते. त्यांना प्रथमेश संशयितरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा करताच तो पळून जाऊ लागला. यामुळे पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडले. चौकशीअंती त्याने काही दिवसांपूर्वी पुंडलिकनगर परिसरातील एका घरातून सोन्याची दोन बिस्किटे चोरल्याची कबुली दिली. ही बिस्किटे मुकुंदवाडीतील सोन्या-चांदीच्या दुकानदार मित्राला १ लाख ५० हजारांत विक्री केल्याचे सांगितले. या पैशातून त्याने एक मोटारसायकल खरेदी केली होती. पोलिसांनी आरोपीसह मुकुंदवाडीतील दुकानदाराकडून सुमारे १ लाख ६० हजारांची सोन्याची बिस्किटे जप्त केली.
======
आरोपी बीबीएचा विद्यार्थी
आरोपी प्रथमेश हा बीबीएच्या प्रथम वर्षात शिकतो. त्याचे वडील औद्योगिक वसाहतीत माल पुरवठादार आहेत. आई-वडिलांकडून पैसे घ्यायचे नाही आणि स्वतःच्या हिमतीवर पैसा कमवायचा म्हणून तो मॉलमध्ये पिझ्झा सेंटर येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पिझ्झाची डिलिव्हरी करता करता उघड्या घरातून किमती माल पळविण्याचे आणखी काही गुन्हे त्याने केले असावेत, असा संशय पोलिसांना आहे.