अजिंठा लेणीच्या तिकीटातील अतिरिक्त विद्युत शुल्क रद्द; जाणून घ्या नवे प्रवेश शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 01:42 PM2021-07-28T13:42:34+5:302021-07-28T13:43:18+5:30
Ajanta Caves news : प्रवेश शुल्क ४० आणि विद्युत शुल्क ५ असे एकूण ४५ रुपये तिकीट शुल्क म्हणून आकारण्यात येत होते.
सोयगाव : जगप्रसिद्ध अजिंठालेणी पाहण्यासाठी प्रवेश शुल्कासोबत लागणारे अतिरिक्त विद्युत शुल्क रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर अजिंठालेणी दर्शनासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून प्रतिव्यक्ती केवळ ४० रुपये शुल्क आकारले जाणारा आहे. ( Cancellation of additional electricity charges on Ajanta Caves tickets)
भारतीय पुरातत्त्व विभागाच्यावतीने अजिंठालेणी दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना प्रति व्यक्ती ४० रुपये तिकीट व लेणी क्रमांक १, २, १६ आणि १७ साठी विद्युत शुल्क म्हणून अतिरिक्त ५ रुपये आकारण्यात येत होते. प्रवेश शुल्क ४० आणि विद्युत शुल्क ५ असे एकूण ४५ रुपये तिकीट शुल्क म्हणून आकारण्यात येत होते. आता यातील विद्युत शुल्काचे अतिरिक्त ५ रुपये रद्द करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. यापुढे पर्यटकांना आता प्रती व्यक्ती केवळ ४० रुपये तिकीट भरून अजिंठालेणीतील चित्रशैली व शिल्पकलेचा आनंद लुटता येणार आहे. अजिंठालेणी भेटीवर आलेले पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणचे तिकीट शुल्क भरुन वैतागून जात. यातच अतिरिक्त विद्युत शुल्कावरुन अनेकदा तिकीट खिडकीवर पर्यटक हुज्जत घालतांना दिसून येत होते. हे अतिरिक्त शुल्क रद्द झाल्याने पर्यटकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
अजिंठा लेणी पाहताना असे लागते शुल्क
अजिंठालेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांकडून फर्दापूर टि-पॉइंट येथे सुविधा शुल्क म्हणून पर्यटन महामंडळ प्रतिव्यक्ती दहा रुपये आकारते, बस भाडे विनावातानूकुलित बस एकेरी फेरीसाठी २० रुपये तर वातानुकूलित बससाठी ३० रुपये एस.टी महामंडळाकडून आकारले जातात. तर अजिंठालेणीत भारतीय पुरातत्त्व विभागाकडून प्रतिव्यक्ती ४० रुपये तिकीट आकारण्यात येते.