'विश्वास बसणार नाही, विमान घ्यावे वाटेल'; पेट्रोल-डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 02:06 PM2021-07-28T14:06:13+5:302021-07-28T14:09:56+5:30
fuel News : इंधनाचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना तुलनेने विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : पेट्रोल, डिझेलच्या किमतीपेक्षा आकाशात भरारी घेणाऱ्या विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे दर कमी आहेत, असे सांगितले तर विश्वास बसेल का आणि हे खरे असेल तर मग आता रोजच्या कामासाठी विमान वापरावे का, असा विचारही अनेकांच्या मनात नक्की येईल. पण, हे खरे आहे. औरंगाबादेत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर १०९ रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर ९८ रुपयांच्या घरात आहे. विमानासाठी लागणाऱ्या ‘एटीएफ’ इंधनाचा भाव मात्र प्रतिलिटर ६० रुपये आहे. पण, हे इंधन फक्त विमानांसाठीच असते. ( Aviation fuel is cheaper than petrol-diesel)
आकाशातून झेप घेत जाणाऱ्या विमानाचे आता फारसे कौतुक उरलेले नाही. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे औरंगाबादच्या आकाशातून रोज विमानांचे उड्डाण होत आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद यांसारख्या शहरांना काही तासांतच औरंगाबादकरांना पोहोचता येत आहे. विमानांच्या इंधनासाठी चिकलठाणा विमानतळावर दोन स्टेशन्स आहेत. यात एका स्टेशनची ७० हजार लिटर आणि दुसऱ्या स्टेशनची २ लाख १० हजार लिटर क्षमता आहे. साधारण महिन्याला ४० ते ५० विमानांमध्ये याठिकाणी इंधन भरले जाते. दररोज ५० विमानांचे उड्डाण झाले तरी ही दोन्ही स्टेशन्स इंधन भरू शकतील, एवढी मोठी क्षमता आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिक हैराण झाले आहेत. इंधनाचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना तुलनेने विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक ग्राहकासाठी म्हणजे कंपनीसाठी हा दर कमी-अधिक असतो. पण विमानात काही लिटर नाही, एकाच वेळी हजारो लिटर इंधन भरावे लागते.
ए. टी. एफ., पांढरे पेट्रोल
विमानासाठी वापरले जाणारे इंधन अतिशुद्ध स्वरूपातले असते. त्यास ‘पांढरे पेट्रोल’ असेही म्हटले जाते. त्यास ‘एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) असे तांत्रिक नाव आहे. हवामान थंड असो वा गरम, विमानातले इंधन इंजिनाला सतत शक्ती पुरवीत राहते. ते गरमीमुळे उडून जात नाही की थंडीमुळे गोठत नाही.
दोन कंपन्यांची सुविधा
विमानतळावर विमानात टँकरने इंधन भरले जाते. यासाठी आपल्याकडे दोन कंपन्यांची सुविधा आहेत. औरंगाबादला वॅट ५ टक्के असल्याने जवळपास सर्व विमाने इथे इंधन भरतात. विमानाच्या इंधनाला ए.टी.एफ. म्हणतात. त्याचा दर साधारण ६० रुपये लिटर आहे.
- विनायक कटके, सहायक महाप्रबंधक (वायू यातायात नियंत्रण), चिकलठाणा विमानतळ