- गजानन दिवाण
औरंगाबाद : शुद्ध समजून २० रुपयांत लिटरभर पाणी खरेदी करून ते पीत असाल, तर सावधान! पाण्यासोबत तुम्ही प्लास्टिकदेखील पोटात घेत आहात. या पाण्यातील मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण अलीकडे वाढले असल्याचा धक्कादायक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. एकट्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास दररोज लाखो लिटर बाटल्यांचे पाणी माणसाच्या पोटात जात असल्याची माहिती ‘लोकमत’च्या पर्यावरण डेस्कने मिळविलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या १२४ पानांच्या अहवालात बाटल्यांमधील पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले आहे. याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर काय होतो, यासंदर्भात मात्र ठोस काही त्यांच्या हाती अद्याप लागलेले नाही. यासाठी यावर आणखी काम करण्याची गरज असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मायक्रोप्लास्टिक म्हणजे साधारण पाच मिलिमीटर आकार असलेले प्लास्टिकचे हे कण असतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. पिण्याच्या पाण्यात तर हा आकार एक मिलिमीटर इतकादेखील असू शकतो. प्रत्यक्षात एक मिलिमीटरपेक्षा छोट्या कणांना नॅनोप्लास्टिक असे म्हटले जाते. यामुळे माणसाच्या शरीराला धोका पोहोचतोच असेही नाही. मात्र, यावर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे.
या अहवालानुसार, देशात प्लास्टिकचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे. एका अन्य अहवालानुसार १९५० पासून आतापर्यंत तब्बल ८३० कोटी टनापेक्षा अधिक प्लास्टिकचे उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत हा आकडा दुप्पटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जगाचा विचार केल्यास प्रत्येक मिनिटाला जवळपास १० लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या जातात आणि या सर्व बाटल्या प्लास्टिकपासून बनविल्या जातात. या पाण्याच्या माध्यमातून प्लास्टिकचे छोटे-छोटे कण आपल्या पोटात जात असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. प्लास्टिकचे हे कण केवळ बाटलीतूनच पाण्यात मिसळतात, असे नाही, तर पाऊस, कचरा, प्रदूषित पाण्यातून प्लास्टिकचे हे छोटे-छोटे कण आपल्या पाण्यात मिसळतात. बाटलीबंद पाण्यात बाटली आणि त्याच्या झाकणात वापरला जाणारा पॉलिमर हा देखील चिंतेचा विषय आहे. या अहवालानुसार, १५० मायक्रोमीटर (केसाच्या जाडीइतके) पेक्षा मोठे मायक्रोप्लास्टिक माणसाच्या शरीरात जाण्याची शक्यता नसल्यात जमा आहे. त्याचवेळी अगदीच छोटे मायक्रोप्लास्टिक कण किंवा नॅनो आकाराचे प्लास्टिक माणसाच्या पोटात शोषित केले जाऊ शकते. याचा परिणाम काय होऊ शकतो, याचा डेटा मात्र पुरेसा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
२०० कोटी लोकांना जगभरात दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाण्यातील मायक्रोप्लास्टिकपेक्षाही पाण्यातील जीवाणू-विषाणूला दूर करण्यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
४, ८५,०००लोकांना जगभरात २०१६ सालात दूषित पाण्यामुळेच आपला जीव गमवावा लागला आहे.
मायक्रोप्लास्टिकचा धोका काय?मायक्रोप्लास्टिक आपल्या आरोग्याला थेट हानिकारक नसले तरी प्लास्टिकमध्ये वापरले जाणारे रसायन माणसाला हानिकारक ठरू शकते. मायक्रोप्लास्टिकच्या मदतीने रोगनिर्मिती करणारे जीवजंतूदेखील माणसाच्या शरीरात अगदी सहजतेने पसरू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
काय करायचे?या संकटावर जागतिक आरोग्य संघटनेनेच उपाय सुचविला आहे. पाण्यावर प्रक्रिया करून हे मायक्रोप्लास्टिक ९० टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते. त्यासोबत शासनाने आणि सर्वसामान्यांनीही प्लास्टिकचा वापर कमीत कमी कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे संघटनेने म्हटले आहे.
मायक्रो प्लास्टिक आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर तातडीने अभ्यास होण्याची गरज आहे. कारण जगाच्या प्रत्येक कोपºयात पिण्याच्या पाण्यात या मायक्रोप्लास्टिकचा अंश आहे. यासोबतच आम्हाला प्लास्टिक प्रदूषणात होणारी वाढ रोखण्याची गरज आहे. - मारिया नीरा, प्रमुख, सार्वजनिक आरोग्य विभाग, जागतिक आरोग्य संघटना. राज्यातील बाटलीबंद पाण्याचा आणि प्लास्टिकचा बाजारमुंबई - मुंबईत रोज जवळपास ८ हजार मेट्रिक टन इतका कचरा निर्माण होतो. ज्यामध्ये २२५ ते २५० मेट्रिक टन प्लास्टिक असते. मुंबईत महिन्याला २५० कोटी लिटर बाटलीबंद पाण्याची विक्री होते, अशी माहिती जलतज्ज्ञ आणि पाणी हक्क समितीचे निमंत्रक सीताराम शेलार यांनी दिली. ...............पुणे - पुण्यात दररोज २,००० ते २,२०० मेट्रिक टन इतका कचरा जमा होतो. त्यापैकी साधारण २५० ते ३०० मेट्रिक टन कचरा हा प्लास्टिकचा असतो. पुणे शहर जिल्ह्यात दोनशेहून अधिक पॅकेजिंग वॉटर ड्रिंकिंगच्या बाटल्यांच्या कंपन्या आहेत. शहरात दररोज प्लास्टिकच्या एक लिटर पाण्याचे ३५ ते ४० हजार बॉक्स विकले जातात. एका बॉक्समध्ये १२ बॉटल असतात. ही संख्या सर्वसाधारण दिवसातील असून, लग्नसराईत हे प्रमाण दुप्पट असते................कोल्हापूर - जिल्ह्यात रोज एक लाख पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. यात २० लिटर्सचे १५ हजार जार आणि उर्वरित १ ते २ लिटरच्या बाटल्या असतात. जिल्ह्यात या बाटल्यांच्या ३० कंपन्या आहेत. महापूरकाळात तर कोल्हापुरात रोज पाच लाख पाणी बाटल्यांची विक्री झाली. त्यात २० लिटर जारचे प्रमाण जास्त होते. शहरात रोज १९० टन कचरा निघतो. यात निव्वळ प्लास्टिकचा कचरा जवळपास ९० टन इतका असतो. ...........नागपूर - ४० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात दररोज १,२५० मेट्रिक टन कचरा निघतो. यात २,००० किलो कचरा प्लास्टिकचा असतो. दररोज किमान ५० ते ७० हजारच्या जवळपास पाणी बॉटल्स कचºयात निघतात. ............सोलापूर - शहरात रोज ८० हजार बाटल्यांची विक्री होते. प्लास्टिकचा कचरा रोज दीड टन जमा होतो.................अकोला - शहरात दररोज २४ ते २७ हजार बॉटल पाण्याची विक्री होते. ..............नाशिक - शहरात दररोज ५०० टन एकूण कचर निघतो. त्यात ३ टन कचरा प्लास्टिकचा असतो. .......सातारा- शहरात रोज पाण्याच्या २० हजार बाटल्यांची विक्री होते. शहरात रोज निर्माण होणारा कचरा ७० ते ७५ टन असून, यात साडेतीन ते ४ टन कचरा प्लास्टिकचा असतो. ..............औरंगाबाद - शहरात दररोज एक ते सव्वालाख पाणी बाटल्यांची विक्री होते, असे व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे यांनी सांगितले...........अहमदनगर - शहरात दररोज अंदाजे ६० ते ६५ हजार पाण्याच्या बाटल्यांची विक्री होते. शहरात दररोज ६ ते ७ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. ...........जळगाव - शहरात दररोज २ टन प्लास्टिकची विक्री होते. १५ ते १६ टन प्लास्टिक कचरा दररोज जमा होतो. त्यापैकी केवळ ४ टन प्लास्टिकवर प्रक्रिया होते.
.....
गोव्यात - पणजी महापालिका क्षेत्रात ४० हजार लोकसंख्या आहे. गोवा हे पर्यटन स्थळ आहे आणि पणजी राजधानी शहर असल्याने महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या दुप्पट पर्यटक येथे भेट देत असतात. पाण्याच्या बाटल्यांचा खप सुमारे २ टन एवढा असून महापालिका क्षेत्रात रोज सुमारे ७ टन सुका कचरा निर्माण होतो. त्यात सुमारे अडीच टन प्लास्टिकचा असतो.