औरंगाबाद: व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबलवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीबीआयने व्हिडीओकॉन आणि नूपॉवर रिन्युएबलच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील कार्यालयांवर देखील छापेमारी केली आहे.
सीबीआयने आज व्हिडीओकॉन कंपनीच्या मुंबई, औरंगाबादमधील कार्यालयांवर छापे टाकले. औरंगाबादजवळील चितेगाव येथील कार्यालयावर सीबीआयच्या पाच अधिकारी असलेल्या पथकाने तपासणी केली. तसेच सकाळी ११ वाजता क्रांतीचौक येथील कार्यालय कर्मचाऱ्यांना बाहेर काढून सील करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात सीबीआयने दीपक कोचर, वेणूगोपाल धूत आणि त्यासंबंधित अन्य काही लोकांची प्राथमिक चौकशी सुरू केली होती.