डॉ. प्रिती पोहेकर यांना केंद्र शासनाचा आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 06:31 PM2021-10-26T18:31:53+5:302021-10-26T18:33:15+5:30

प्रा. डॉ. प्रिती पोहेकर यांनी न्यूनत्वावर मात करुन केलेल्या शैक्षणिक, व सामाजिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची या पूरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

Central Government's Ideal Personality - Role Model Award announced to Dr. Preeti Pohekar | डॉ. प्रिती पोहेकर यांना केंद्र शासनाचा आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार जाहीर

डॉ. प्रिती पोहेकर यांना केंद्र शासनाचा आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्दे३ डिसेंबर रोजी होणार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

पैठण ( औरंगाबाद ) : पैठण येथील प्रा. डॉ. प्रिती पोहेकर यांना 'राष्ट्रपती पुरस्कार' जाहीर झाला आहे. १ लाख रुपये व सन्मानपत्र असे या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून दि. ३ डिसेंबर रोजी दिल्ली येथील समारंभात राष्ट्रपतींंच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पैठण येथील माजी उपनगराध्यक्ष दिलीप पोहेकर यांच्या त्या कन्या आहेत. लातूरच्या  राजर्षी शाहू कला आणि वाणिज्य महाविद्यालयात लोकप्रशासशन विभागप्रमुख पदावर त्या सध्या कार्यरत आहेत. 

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण विभागाच्या वतीने दिला जाणारा 'आदर्श व्यक्तिमत्व - रोल मॉडेल' हा राष्ट्रीय पुरस्कार आहे. दिव्यांगत्वावर मात करून विशेष यश प्राप्त करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. प्रा. डॉ. प्रिती पोहेकर यांनी न्यूनत्वावर मात करुन केलेल्या शैक्षणिक, व सामाजिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची या पूरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

शिक्षणतज्ञ तसेच नावीन्यपूर्ण संशोधक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ११ अंतरराष्ट्रीय व १४ राष्ट्रीय स्तरावरील परिषदा व सेमिनारमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी राज्य व विभागीय स्तरावरीलही १४ परिषद, चर्चासत्र व कार्यशाळामध्ये साधन व्यक्ती म्हणून शोधनिबंध सादर केलेले आहेत. १७ अतिथी व्याख्याने दिली आहेत. त्यांची ९  संदर्भ पुस्तके असुन ९ मराठी तर १ इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेली आहेत. ही ग्रंथसंपदा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (संभाजीनगर) येथील अभ्यासक्रमांना लागू आहेत. त्यांचे संशोधन कार्य आणि लेख महिला विकास आणि दिव्यांग व्यक्ति, 'विशेषतः दिव्यांग महिला पुनर्वसन' यासंदर्भात झालेले आहे. त्या 'सक्षम' या दिव्यांग क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या संस्थेच्या देवगिरी प्रांताच्या महिला विभागप्रमुख आहेत. तसेच त्या हाडाच्या निवेदक व सूत्रसंचालीका देखील आहेत. डॉ. पोहेकर यांचं शिक्षण औरंगाबाद येथील सरस्वती भूवन महाविद्यालयात झालेलं असून संतभूमी पैठण या जन्मगावी त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.   

सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आणि विद्वत्तेचा वारसा लाभलेल्या पैठण या संतभुमीतील कन्येच्या कर्तृत्वाचे कौतुक. प्रा. पोहेकर या फक्त दिव्यांगांसाठीच नाही तर सर्वसामान्या़साठीही एक आदर्श व्यक्तिमत्व ठरल्या आहेत. - संदिपान भुमरे, रोहयोमंत्री

Web Title: Central Government's Ideal Personality - Role Model Award announced to Dr. Preeti Pohekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.