‘सीजीओ’मुळे सामान्यांच्या अपेक्षा वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:08+5:302021-01-19T04:07:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादेत शहराच्या विकासासाठी ‘सीजीओ’ अर्थात को-गव्हर्नमेंट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादेत शहराच्या विकासासाठी ‘सीजीओ’ अर्थात को-गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन स्थापन करण्याची घोषणा केली. या घोषणेला बळ देण्याचे काम महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले. लवकरात लवकर सीजीओ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मागील काही वर्षांपासून थांबलेल्या विकासचक्राला पुन्हा गती मिळण्याची शक्यता सर्वसामान्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.
निव्वळ घोषणा करून चालणार नाही
शिवसेना आणि मित्रपक्षांच्या सरकारकडून वारंवार घोषणा होत आहेत. मात्र, अंमलबजावणी काहीच होत नाही. शहरातील नवीन पाणीपुरवठा योजना, जंगल सफारी पार्क अशा कितीतरी योजना रखडल्या आहेत. शहर विकासासाठी सीजीओ स्थापन करण्याचा निर्णय चांगला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी झाली पाहिजे.
अमेय दिवाकर देशमुख, भाजप कार्यकर्ता
एकानंतर एक चांगले निर्णय
महाविकास आघाडी सरकारने मागील एक वर्षात दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे. शहरातील पाणीप्रश्न क्षणार्धात सोडविण्यात आला. रस्त्यांसाठी १५२ कोटी रुपये दिले. सीजीओ स्थापन करून सरकार नागरिकांच्या स्वप्नातले शहर उभारण्याचा प्रयत्न करत आहे, ही चांगली व अभिमानास्पद बाब आहे.
सागर संजय नागरे, काँग्रेस कार्यकर्ता.
दिलेला शब्द शिवसेनाच पाळते
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे शहरात लवकरच सीजीओ मंडळ स्थापन होईल. या मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या सूचना महापालिकेमार्फत शासनाकडे जातील. एक सुंदर आयडियल शहर यातून निर्माण होईल, अशी अपेक्षा करायला अजिबात हरकत नाही.
संजय सांडू हरणे, कार्यकर्ता, शिवसेना.
पुढील चार वर्षात शहराचा विकास नक्की होणार
मागील वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने मोठे प्रश्न मार्गी लावले. शहरातील इतर विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सीजीओ मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच आगामी चार वर्षांत शहरात विकासाची अनेक कामे मार्गी लागतील.
वैशाली साबळे पाटील, कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस.
सरकारने जुन्या शहराकडेही लक्ष द्यावे
महाविकास आघाडी सरकारकडून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. ही कामे करताना जुन्या औरंगाबाद शहराला विचारात घेतले पाहिजे. १५२ कोटी रुपये निधीतून रस्ते करताना जुन्या शहराला खूप काही मिळाले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भविष्यात तरी सीजीओ स्थापन झाल्यावर असे होऊ नये, हीच रास्त अपेक्षा आहे.
सलीम पटेल बोरगावकर, कार्यकर्ता, एमआयएम.