औरंगाबाद: भावाला भेटून घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. ही खळबळजनक घटना टिळकनगर येथील दत्तमंदीराजवळ सोमवारी(दि.१०) दुपारी १.२१ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, टिळकनगर येथील रहिवासी शालिनी हजारे यांचे भाऊ त्यांच्याच कॉलनीत राहतात. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्या भाऊ आणि भावजयीला भेटण्यासाठी भावाच्या घरी मोपेडने गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घरासमोर मोपेड उभी केली होती. दुपारी १.२१ वाजेच्या सुमारास शालिनी भावाला भेटून घरी जाण्यासाठी मोपेडजवळ आल्या.यावेळी त्यांनी मोपेडला चावी लावली त्याचवेळी दुचाकीस्वार दोन चोरटे अचानक त्यांच्या जवळ आले. यावेळी एकाने त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोनसाखळी हिसकावल्याने शालिनी या खाली पडल्याने त्यांच्या हाताला खरचटले.
यावेळी शालिनी या मोपेडने त्यांचा पाठलाग करू शकतात, याचा अंदाज चोरट्यांना आल्याने त्यांनी शालिनी यांच्या मोपेडची चावी काढून पळ काढला. यावेळी शालिनी यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटे खिवंसरा पार्कच्या दिशेने सुसाट निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे, गस्तीवरील गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, कर्मचारी राजू साळुंके आणि जवाहरनगर ठाण्यातील अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.
परिसरातील विविध घरांवरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी पोलीस अधिकारी कर्मचारी सायंकाळपर्यंत करीत होते. शालिनी यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.