बहिणीच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रांची चोरी करणाऱ्यास बेड्या, मेहनत न करता पैसे कमाविण्याचा फंडा
By राम शिनगारे | Published: October 10, 2022 08:29 PM2022-10-10T20:29:40+5:302022-10-10T20:29:56+5:30
आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे बहिणीच्या शिक्षणासह घर खर्चासाठी भागविण्यासाठी एका तरुणाने चोरी करण्याचा मार्ग पत्करला.
औरंगाबाद :
आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे बहिणीच्या शिक्षणासह घर खर्चासाठी भागविण्यासाठी एका तरुणाने चोरी करण्याचा मार्ग पत्करला. उल्कानगरीतील एका उद्योजकाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याच्या प्रकरणात त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आकाश मधुकर मोरे (२४, रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास चोरीचे मंगळसूत्र विकण्यासाठी अट्टल मंगळसूत्र चोरटा चिकलठाणा भागातील जिल्हा रुग्णालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. शेळके यांच्यासह सहायक फाैजदार अजहर कुरेशी, हवालदार विजय निकम, राजेंद्र साळुंके, संजय गावंडे, संजय मुळे आणि संदीप सानप यांच्या पथकाने सापळा लावला. यात मोपेडवर (एमएच-०५-बीएफ-९४३३) आलेल्या मोरेला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे एका बाजूने तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र सापडले. कसून चौकशी केली. त्याने हे मंगळसूत्र २९ सप्टेंबर रोजी त्याचा मित्र रोहन अंभोरे आणि समीर गवई यांच्यासह मोपेडवर ट्रिपल सिट जाऊन उल्कानगरीत महिलेच्या गळ्यातून हिसकावल्याची कबुली दिली. आकाशच्या ताब्यातून १ लाख १० हजार रूपये किमतीच्या मंगळसूत्रासह मोपेड जप्त केली. ही कामगिरी निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्या. एस.एल. रामटेके यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. सरकारची बाजू सहायक सरकारी वकील किशाेर जाधव यांनी मांडली.
ठाणे शहरातून दुचाकी चोरी
आकाशकडे असलेली दुचाकीही चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. ठाणे शहर येथील महात्मा फुले फुले चौक पोलीस ठाण्यात या मोपेड चोरीचा गुन्हा दाखल आहे. आकाशकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आकाशचे साथीदार रोहन अंभोरे आणि समीर गवई हे गुन्हा केल्यापासून फरार आहेत.