छत्रपती संभाजीनगर : रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी आज रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांचे बस स्टँड व रेल्वे स्टेशनवर हाल होताना दिसत आहे. त्याचबरोबर विद्यार्थी, कामगार आणि महिला यांना या आंदोलनामुळे त्रास सहन करावा लाग आहे. रिक्षा कमी आणि प्रवासी जास्त असे व्यस्त प्रमाण असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू आहे.
रिक्षा बंद असल्याने जालना रोडवरून जाणाऱ्या सिटी बस प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. अनेकांनी बसच्या दारात थांबून प्रवास केला
रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांवर आरटीओ कार्यालयाची माहिती : मागणी : रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळाची लवकर अंमलबजावणी करावी.आरटीओ : सदर बाब ही शासन स्तरावरील आहे. सदर मागणीचे निवेदन हे पुढील कार्यवाहीसाठी शासनास सादर करण्यात येईल.
मागणी : कंपनीच्या बस, खासगी वाहनांतून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथक नेमावे.आरटीओ : कार्यालयाच्या वायुवेग पथकातील कार्यकारी अधिकाऱ्यांना कंपन्यांच्या कामगारांना ने-आण करणाऱ्या बसेसने नियमाविरुद्ध वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मागणी : स्मार्ट सिटी बस फक्त मनपा हद्दीत चालविण्यात यावी. ग्रामीण भागातील फेऱ्या बंद कराव्यात.आरटीओ : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार स्मार्ट सिटी बसला मनपा हद्दीत व मनपा हद्दीबाहेर २० कि.मी.च्या आत प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे.
मागणी : रिक्षांचे शेअरिंग दर निश्चित करून दर फलक त्वरित लावून देण्यात यावेत.आरटीओ : शेअरिंग रिक्षांचे मार्ग निश्चित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता आवश्यक आहे. प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत वाहतूक शाखेच्या सहकार्याने सदर प्रस्ताव ठेवण्यात येईल.